कारवाई टाळण्यासाठी घटनास्थळातच बदल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:57 AM2019-01-04T11:57:54+5:302019-01-04T12:00:45+5:30

ललित कोल्हे यांच्या फार्महाऊसवरील डर्टी पार्टी

Changes in the venue to avoid action! | कारवाई टाळण्यासाठी घटनास्थळातच बदल !

कारवाई टाळण्यासाठी घटनास्थळातच बदल !

Next
ठळक मुद्दे कुत्रे मागे लागल्याने घेतला झोपड्यांचा आसरागिरीश महाजन यांचा दबाव

जळगाव : भाजपा नगरसेवक व माजी महापौर ललीत कोल्हे यांच्या मालकीच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्महाऊसवर थर्टी फर्स्टला झालेल्या डर्टी पार्टीचे कवीत्व अजूनही सुरुच असून दररोज नवनवीन किस्से समोर येत आहेत. पोलिसांनी मोठ्या धाडसाने या फार्महाऊसवरील बंगल्याच्या दोन्ही मजल्यात धाड टाकली. राजकीय दबाव गळ्यापर्यंत आल्यानंतर बड्यांवरील कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी चक्क पार्टीचेच स्थळ (घटनास्थळ) बदल केल्याचा नवीन प्रकार आता उघड झाला आहे.
फार्महाऊसच्या दोन्ही मजल्यावर छय्या छय्या सुरु असताना पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळ हे बंगला न दाखविता जळगाव ते ममुराबाद रोडलगत ममुराबाद शिवारात कोल्हे फार्महाऊससमोरील सार्वजनिक मोकळी जागा दाखविली आहे. तेथे सहा महिला व १८ पुरुषांकडून असभ्य वर्तन केले जात असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. १ जानेवारी रोजी पहाटे १.३० वाजताची वेळ घेण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात पोलिसांची धाड पडली तेव्हा बंगल्यातच सर्वांना घेरण्यात आले होते तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. राजकीय दबाव नसल्याचे पोलीस कितीही सांगत असले तरी घटनास्थळ बदलामुळे फार्महाऊसच्या मालकाला वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
आणखी महिला असल्याची चर्चा
कारवाईच्यावेळी झाडे झुडपातून पळताना काही जणांच्या मागे कुत्रे लागले होते. ते भूंकत असताना शेतात राहणारे पावरा समाजाचे काही लोक जागे झाले. पळालेल्यांनी त्यांच्या घरात आसरा घेतला. त्यात फार्महाऊसशी संबंधित एक व्यक्ती होती तर एका पोलिसाचाही या पार्टीत समावेश असल्याची माहिती पुढे आली. या डर्टी पार्टीत ६ तरुणींच्या व्यतिरिक्त काही महिलाही होत्या. एकूण २८ जणांची ही यादी होती, असेही सांगण्यात आले.
हाणामारीच्या घटना
काही महिन्यापूर्वी या जुगार अड्डयावरील वादातून बांधकाम व्यावसायिकाला भर चौकात काही जणांनी मारहाण केली होती. तेव्हा हे प्रकरण शहर पोलीस स्टेशनला गेले होते. आता देखील आठवड्यातून तीन दिवस अलिशान जुगार सुरु असताना पोलिसांकडून कधीच कारवाई झालेली नव्हती. आता प्रथमच अधिकाऱ्याने कारवाईचे धाडस केले.
प्रत्यक्ष कारवाईत मी नव्हतो. कारवाईचे घटनास्थळ कोल्हे फार्म हाऊसचा परिसर दाखविण्यात आला आहे. बाहेर मोकळ्या जागी व आतमध्ये दोन्ही ठिकाणी गर्दी होती. अदखलपात्र गुन्हा असल्याने वाहन जप्त करता येत नाही. त्यामुळे कोणाचेच वाहन जप्त केले नाही. नियमानुसार कारवाई झालेली आहे.
-दिलीप भागवत, पोलीस निरीक्षक, जळगाव तालुका पोलीस स्टेशन
पुराव्यांची छेडछाड
घटनास्थळ बदलविणे म्हणजे पोलिसांनी एक प्रकारे पुराव्यांची छेडछाडच केलेली आहे. दबावामुळेच चुकीची नोंद घेणे पोलिसांना भाग पडले. विशेष म्हणजे कारवाई करताना स्वत: सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन होते. शहरातील किंवा ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही पार्टी होती, ते तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक देखील तेथे नव्हते. राजकीय सूत्र हलल्यानंतर शहरातील तीन निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले होते. वरिष्ठ अधिकाºयांकडून येणाºया फोनमुळे रोहन कमालीचे नाराज झाले होते अशी माहितीही सूत्रांकडून प्राप्त झाली.
यापूर्वी देखील फार्महाऊस चर्चेत... हे फार्महाऊस नेहमीच चर्चेत राहिले आहे. काही महिन्यापूर्वी येथे चोरी झाली होती. जुगारात शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा येथे कोटीच्या घरात रक्कम हरला होता.
गुन्हेगारांना पुन्हा राजाश्रय- राधेश्याम चौधरी
ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवरील प्रकरणात बड्या धेंडांची नावे वगळून कलमांची फेरफार करण्यात आली असल्याची तक्रार राष्टÑवादी कॉँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी ट्युट करून मुख्यमंत्र्याकडे केली आहे. या प्रकरणात मुळ दोषींना मोकाट सोडून भाजपा नेत्यांनी पुन्हा गुन्हेगारांना राजाश्रय देण्याचे काम केले आहे.
गिरीश महाजन यांचा दबाव
या प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दबाव आणल्याची टीका पक्षाचे प्रवक्ते योगेश देसले यांनी केली. महाजन हे समांतर गृहमंत्रालय चालवतात असेच यावरून दिसून येते. या प्रकारामुळे जळगाव शहर आणखी बदनाम झाले आहे. यासाठीच या प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. तर ‘संकट मोचक’ अशा कामात येत असतील तर उपयोग काय? अशी टीका महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी केली. यात निरपराधांना समोर केले गेले मुळ चेहेरे समोर आणावेत असेही त्या म्हणाल्या.
फार्म हाऊवरील बिभत्स प्रकाराची एसआयटी चौकशी करा
ममुराबाद येथील फार्म हाऊसवर महिलांचे बीभत्स नृत्य व दारू पार्टी प्रकरणातील खरे चेहेरे दुरूच ठेवले गेल्याचे सांगितले जाते. हे लक्षात घेऊन या प्रकाराच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली जावी, अशी मागणी राष्टÑवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, हा प्रकार म्हणजे नवीन वर्षाला गालबोट लावण्याचा प्रकार आहे. या प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून राजकीय हस्तक्षेपही झाला.सरकार असले म्हणजे काहीही करायचे व अधिकाºयांवर दबाव आणायचा हे योग्य नाही. याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकाराची एसआयटी मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली.
यंत्रणेचे मनोबल खच्चीकरणाचे काम
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी संपूर्ण जिल्हा अवैध धंदे मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या दिमतीला असलेले सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन हे तडफदार अधिकारी म्हणून ओळखले जातात. सर्वत्र झाडाझडती सुरु असताना कोल्हे यांच्या फार्महाऊसवर धाड टाकण्याचे धाडस रोहन यांनी केले. चुकीचे काम होत असताना पोलीस यंत्रणेला बळ देण्याऐवजी राजकारण्यांकडून कामात अडथळे निर्माण केले जात असून त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा शहरात होत आहे. कधी तरी चांगले अधिकारी लाभले, त्यांचा उपयोग करुन घेणे गरजेचे असताना दबाव आणला जात असल्याने राजकारण्यांबाबत शहरात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

Web Title: Changes in the venue to avoid action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.