जळगावातून चोरलेल्या ट्रकचा रंग बदलताना खामगावात दोघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:31 PM2018-11-01T22:31:36+5:302018-11-01T22:33:30+5:30
सुप्रीम कॉलनीतून चोरलेल्या ट्रकची नंबर प्लेट काढून ट्रकला नवीन रंग करीत असतानाच शेख युसुफ उर्फ बबल्या शेख मुसा (रा.तांबापुरा, जळगाव) व त्याचा साथीदार लक्ष्मीनारायण तल्हार (रा.बाळापूर, ता.खामगाव, जि.बुलडाणा) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी खामगावात अकोला बायपास रोडवर पकडले.
जळगाव : सुप्रीम कॉलनीतून चोरलेल्या ट्रकची नंबर प्लेट काढून ट्रकला नवीन रंग करीत असतानाच शेख युसुफ उर्फ बबल्या शेख मुसा (रा.तांबापुरा, जळगाव) व त्याचा साथीदार लक्ष्मीनारायण तल्हार (रा.बाळापूर, ता.खामगाव, जि.बुलडाणा) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी खामगावात अकोला बायपास रोडवर पकडले.
सुप्रीम कॉलनीतील जनता ट्रान्सपोर्टजवळ गुलाम मुस्तफा कादर यांचे भंगाराचे गोदाम आहे. तेथे फहीम हमीद झारे (वय २९, रा.नेरी दिगर, ता.जामनेर) यांच्या मालकीचा ट्रक (क्र.एम.एच.०४ एफ.डी.२०१३) लावण्यात आला होता. २५ आॅक्टोबरच्या रात्री चोरट्यांनी हा ट्रक लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खामगावात लपविला ट्रक
जळगावातून चोरलेला ट्रक खामगाव येथे अकोला बायपास रोडवर असून त्याचा नंबर प्लेट व रंग बदलविण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंडे व निलेश पाटील यांचे पथक तातडीने खामगाव येथे गेले होते. तेथे बबल्या शेख व लक्ष्मीनारायण तल्हार हे दोन्ही जण ट्रकजवळ आढळून आले. पोलिसांनी खाक्या हिसका दाखविताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. ट्रकचा रंग व नंबर बदलवून खामगाव शहरातच त्याचा व्यवसायासाठी वापर करणार होतो, असे दोघांनी सांगितले. दरम्यान, दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या.आर.डी.सिदनाळे न्यायालयीत कोठडी सुनावली. तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे करीत आहेत.