जळगाव जिल्ह्यात वातावरण बदलाने हळदीचे उत्पादन निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:52 PM2018-04-22T12:52:22+5:302018-04-22T12:52:22+5:30

शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही

Changing environment in Jalgaon district will reduce the production of Haldei by half | जळगाव जिल्ह्यात वातावरण बदलाने हळदीचे उत्पादन निम्म्यावर

जळगाव जिल्ह्यात वातावरण बदलाने हळदीचे उत्पादन निम्म्यावर

Next
ठळक मुद्देबाजारपेठेत मात्र भाव चढेच जिल्ह्यातील माल सांगलीला

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २२ - बदलत्या वातावरणामुळे हळदीच्या पिकावर परिणाम होऊन झाडांची वाढ अपेक्षेपेक्षा दुप्पट झाल्याने हळदीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. इतकेच नव्हे शेतकºयांना मिळणारे भावही निम्म्यावर आले तर दुसरीकडे बाजारपेठेत भाव वाढलेले आहे. विशेष म्हणजे उत्पादन कमी झाल्याने बाजारात तयार हळदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून बाजारात नवीन हळद येण्यास सुरुवात होते. यंदा मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने हळद उत्पादक हवालदिल झाले आहेत. तसे पाहता सांगली ही हळदीची मोठी बाजारपेठ असली तरी जळगाव जिल्ह्यातही यावल, रावेर या भागात हळदीचे उत्पादन घेण्याºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील केळी व कापूस या मुख्य पिकांसह या भागातील शेतकरी हळदीचेही उत्पादन घेऊ लागले आहेत. यंदा कापसावर बोंडअळीचा प्रार्दुभाव व तुरीच्या उत्पादनात आलेली घट या दोन संकटात शेतकरी सापडला असताना आता हळद उत्पादक शेतकरीही निसर्गाच्या लहरीपणात भरडला गेला आहे.
दमट वातावरणामुळे दुप्पट वाढ
हळदीच्या पिकाला पाणी कमी असले तरी चालते. त्यामुळे पाऊस कमी झाल्याचा परिणाम न होता हळदीवर दमट वातावरणाचा परिणाम झाल्याचे हळद उत्पादक शेतकºयांनी सांगितले. तसे पाहता हळदीच्या झाडाची उंची साधारण तीन फुटापर्यंत असते, मात्र यंही ही झाडे साडेपाच फुटापर्यंत वाढली. यात केवळ उंची वाढली, मात्र उत्पादन थेट निम्म्यावर आले. गेल्या वर्षी यावल, रावेर परिसरातील शेतकºयांना एकरी १५० क्विंटल हळदीचे उत्पादन झाले होते, त्यात यंदा घट होऊन ते थेट ८० क्विंटल प्रति एकरावर आले आहे.
दुहेरी संकट
यावल, रावेर या भागात दीड हजार एकरावर हळदीची लागवड करण्यात आली असून या पिकातून शेतकºयांना मोठी अपेक्षा होती. मात्र एक तर उत्पादनात घट व दुसरीकडे शेतकºयांच्या मालाला भाव नसल्याने हळद उत्पादक हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षी तयार हळदीला आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता, तो यंदा केवळ ५ हजार ८०० रुपयांवर आला आहे. तसे पाहता काही दिवसांपूर्वी हा भाव ११ हजार रुपये प्रति क्विंटल होता, मात्र त्यात जवळपास निम्माने घट झाल्याचे शेतकºयांनी सांगितले.
जिल्ह्यातील माल सांगलीला व सांगलीचा माल बाजारपेठेत
जिल्ह्यात हळदीचे उत्पादन घेऊन ती तयार करण्यासाठी शेतकºयांची या दिवसात लगबग असते. १०० किलो हळदीपासून तयार हळदीचा केवळ २० टक्के उतारा येतो. यात ८० टक्के घट तर येतेच त्यात यंदा उत्पादनात घट झाल्याने हळद उत्पादक चिंतीत झाले आहे. जिल्ह्यात तयार झालेली हळद सांगली येथे पाठविली जाते. तेथे जळगाव जिल्ह्यातील हळदीला मुळातच भाव कमी दिला जातो व त्यात वाहतुकीचा खर्च वेगळा असतो. येथील माल सांगलीला विक्री करावा लागतो तर जळगावच्या बाजारपेठेत सांगलीचा माल आयात केला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील मालाला चांगला भाव मिळण्यासाठी जिल्ह्यातच हळद खरेदीचा बाजारपेठ तयार व्हावी, अशी मागणी शेतक-यांची आहे.
बाजारपेठेत भाव तेजीत
एकीकडे शेतकºयांच्या मालाला भाव नाही व दुसरीकडे उत्पादन कमी आल्याने व वातावरणाच्या परिणामामुळे दर्जावरही परिणाम झाल्याने चांगल्या मालाचे भाव बाजारपेठेत तेजीत आहे. सध्या बाजारात भाव १८० ते २३० रुपये किलो आहे. त्यात फेब्रुवारी ते मे महिन्यात लोणचे व मसाल्यासाठी हळदीची खरेदी केली जाते. त्यामुळे मागणी वाढून आणखी भाव वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे.
निर्यात वाढली
हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे जपान व अरब राष्ट्रांमध्ये हळदीला मागणी वाढल्याने या देशांमध्ये निर्यात वाढल्याने हळदीचे भाव वाढत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.

वातावरणातील बदलामुळे हळदीच्या पिकाची वाढ जास्त झाली व उत्पादन निम्म्यावर आले आहे. त्यात भावही कमी मिळत आहे. वाहतूक खर्च वाचून हळदीला चांगला भाव मिळण्यासाठी जिल्ह्यातच हळदीची खरेदी केली जावी
-हेमराज फेगडे, हळद उत्पादक, यावल

नवीन हळदीची आवक सुरू आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने सध्या असलेल्या भावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
-अशोक धूत, व्यापारी.

Web Title: Changing environment in Jalgaon district will reduce the production of Haldei by half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.