भागपूर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे भाग्य बदलणारा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 09:25 PM2019-03-08T21:25:19+5:302019-03-08T21:25:39+5:30
भागपूर उपसा सिंचन योजनेचे भूमीपूजन
पहूर, ता. जामनेर - भागपूर उपसा सिंचन प्रकल्प हा शेतकऱ्यांचे भाग्य बदलवणारा प्रकल्प असून यामुळे शेतीचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी व श्रीमंत होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी पहूर येथे शुक्रवारी केले.
भागपूर उपसा सिंचन योजना टप्पा २ या योजनेचे ई भूमीपूजन चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत विकास महामंडळ जळगाव, उपसा सिंचन बांधकाम विभाग जळगाव यांच्यावतीने जामनेर रोडलगत पहूर येथे आयोजित या कार्यक्रमप्रसंगी या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार स्मिता वाघ, हरीभाऊ जावळे, संजय सावकारे, उन्मेष पाटील, सुरेश भोळे, माजी मंत्री एम.के.पाटील, जि.प.उपध्याक्ष नंदकिशोर महाजन, राज्याचे माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, पेठ सरंपच नीता पाटील, कसबे सरंपच ज्योती घोंगडे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जि.प.महिला बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, सभापती रूपाली पाटील, नगरध्याक्षा विजया खलसे, कृउबा समिती सभापती संजय देशमुख, तापी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ए.एस.मोरे, कार्यकारी संचालक एस.डी. कुलकर्णी, जि.प.सदस्य अमित देशमुख, पं.स. सदस्य नीता पाटील, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, प्रांतधिकारी चवरे उपस्थित होते.
दरवर्षी सहाशे साठ कोटींचे उत्पन्न वाढणार
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, दोन हजार तीनशे कोटींचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे दरवर्षी जामनेर, पाचोरा व जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे दरवर्षी सहाशे साठ कोटींचे उत्पन्न वाढणार आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून २०१५-१६ या वर्षात पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील शेतकºयांचे उत्पन्न चाळीस हजार कोटी ने वाढले आहे. शेतीचा विकासक २३ टक्केच्या पुढे गेला आहे.
कॉंग्रेसच्या काळात शेती विकास दर ठप्प
आम्ही शेतकºयांना आनंदी व श्रीमंत करणारे असून काँग्रेसच्या सरकारने फक्त शेतकºयांना अशिक्षित ठेवण्याचे धोरण स्वीकारल्याने त्यांच्या कार्यकाळात शेतीविकास दर वाढला नाही, तो आमच्या सरकारने करून दाखविले आहे. हा प्रकल्प पूर्ण करणे ही गिरीश महाजन यांची जबाबदारी आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी अवघ्या पाच मिनिटात अध्यक्षीय भाषण उरकले.
मी खाली तिजोरीचा मंत्री - गुलाबराव पाटील
आमची जबाबदारी तुमच्यावर आहे, तुमच्याकडे बजेट आहे. मी खाली तिजोरीचा मंत्री आहे. शेवटी शेजारच्या महाजनांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटवून भले केले आहे, असे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हणताच सभा स्थळी एकच हशा पिकला. शेतकºयांना पाणी, रस्ते, वीज हे मिळाल्यास शेतकºयांचे उत्पन्न वाढणार आहे, यात शंका नाही. पण पाच तालुक्यांचा तापी प्रकल्प असलेल्या निम्न तापी प्रकल्पाला निधीची तरतूद करून प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याची अपेक्षा ही महाजनांकडून आहे असे ना गुलाबराव पाटील म्हणाले.