रुळ बदलविताना मालगाडीचे दोन डबे भादलीजवळ घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:06 PM2020-03-25T12:06:18+5:302020-03-25T12:07:25+5:30
क्रेनच्या सहाय्याने मदतकार्य : दोन तासांनी वाहतूक सुरळीत
जळगाव : जळगावहून भुसावळकडे जाताना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भादली (ता. जळगाव) जवळ रुळ बदलविताना मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरल्याची घटना घडली. यावेळी अत्यानुधीक क्रेनच्या मदतीने डबे बाजूला करुन दोन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली.
रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दगडांची बारीक खडी घेऊन जळगावकडून एक मालगाडी भुसावळकडे जात होती. यावेळी भादली जवळ एकमेकांना जोडलेल्या रुळांच्या ठिकाणी (मार्ग बदलण्याकरिता असलेली सुविधा) रुळ बदलविताना या मालगाडीचे दोन डबे घसरले. सुदैवाने रुळावरुन घसरलेले डबे पूर्ण पलटी न होता, फक्त रुळाच्या ते खालीच घसरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच भुसावळ येथून आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी अत्यानुधिक क्रेन मागविण्यात आली. या क्रेनच्या मदतीने रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करुन हे डबे बाजूला केले. त्यानंतर दोन तासांनी ही वाहतूक सुरळीत सुरु झाली. घटनेच्या ठिकाणी रेल्वेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्यातरी जळगावकडून भुसावळकडे जाणाºया मालगाड्या जळगाव स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या.