चणकापूर, पुनंद धरणाला चकवा देतेय वृष्टी, ‘गिरणा’ म्हणते, पाण्याने भर देवा माफी सृष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 07:00 PM2023-09-24T19:00:28+5:302023-09-24T19:01:07+5:30
९ दिवसांपासून गिरणेच्या पातळीत अत्यल्प वाढ : नांदगाव, त्र्यंबक, सटाणा भागात पावसाअभावी अडचण
कुंदन पाटील
जळगाव : गिरणा धरणाच्या वरच्या भागात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात ९० टक्क्यांवर जलसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र दि.१६ सप्टेंबरपासून नाशिकच्या पाच प्रकल्पाच्या भागात पाऊस पडत नसल्याने ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याचा विसर्ग वाढत नसल्याने गिरणा धरणातील जलसाठ्याची पातळी उंचावत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
नांदगाव (नाशिक) तालुक्यात असलेल्या गिरणा धरणामुळे जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यासाठी प्रचंड लाभदायी आहे.चाळीसगाव व नांदगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या या धरणाचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्याला होतो. मात्र यंदा या धरणाची पातळी गेल्या आठ दिवसांपासून अत्यल्प प्रमाणात वाढताना दिसत आहे. सर्वदूर पाऊस होत असताना गिरणाची पातळी का उंचावत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मात्र गिरणा धरणाच्या जलपातळी उंचावण्यासाठी पूरक ठरणाऱ्या नांदगाव, सटाणा,मालेगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस नाही. त्यामुळे चणकापूर , पुनंद, ठेंगोडा बंधारा, हरणबारी व नाग्यासाक्या धरणातून ओंसाडून वाहणारा जलसाठा गिरणा धरणात येत नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
ठेंगोडा बंधारा महत्त्वाचा
चणकापूर धरणात सध्या ९५.९३ टक्के जलसाठा आहे. तर पुनंदमध्ये ९६.७६, हरणबारीत व नाग्यासाक्या धरणात १०० टक्के जलसाठा आहे. चणकापूर आणि पुनंदमधील जलसाठा १०० टक्के झाल्यानंतर ओसांडून वाहणारे पाणी ठेंगोडा बंधाऱ्यात येते. हा बंधारा ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्यातील पाणी गिरणा धरणात येते.
मात्र गेल्या १६ सप्टेंबरपासून नांदगाव, सटाणा, वणी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव भागात जोरदार पाऊस नाही. नाशिकसह अन्य तालुक्यात पाऊस आहे. तो पाऊस मात्र गिरणासाठी लाभदायी नाही. परिमाणी चणकापूर व पुनंद धरण ओंसाडून वाहून निघत नसल्याने ठेंगोडा बंधारा कोरडाठाक पडला आहे. या दोन्ही धरणातून ओव्हरफ्लो झालेल्या पाणयामुळे ठेंगोडा बंधारा भरुन निघाल्यानंतरच गिरणा धरणातील जलसाठ्यात प्रभावी वाढ होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
जलस्त्रोत असलेल्या भागात गेल्या १० दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात प्रभावीपणे वाढ झालेली नाही.
-वजय जाधव, उपविभागीय अभियंता, गिरणा पाटबंधारे.
धरणनिहाय जलसाठ्याची टक्केवारी
हतनूर-७४.९०
वाघूर-९३.५७
गिरणा-५५.३८
अभोरा-१००
मंगरुळ-१००
सुकी-१००
मोर-९५.५८
अग्नावती-०९.२८
हिवरा-२३.७९
बहुळा-५०.८५
तोंडापूर-१००
अंजनी-८२.७४
गूळ-८०.६६
भोकरबारी-२१.७६
बोरी-२८.३२
मन्याड-००