पाच पावले ओढून रथोत्सवाची समाप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:48+5:302021-07-21T04:12:48+5:30
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पिंप्राळ्यातील रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. फक्त पाच पावले रथ ओढून १४६ ...
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पिंप्राळ्यातील रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. फक्त पाच पावले रथ ओढून १४६ वर्षांची ही परंपरा कायम ठेवण्यात आली, तसेच दुसरीकडे शहरातील विविध ठिकाणच्या मंदिरांमध्येही साध्या पद्धतीने पूजन झाले. कोरोनासंबंधी सर्व नियम पाळून शहरातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये नागरिकांना दर्शनासाठी मंदिरे उघडी ठेवण्यात आली होती.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही पंढरपुरातील आषाढी एकादशीचा यात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशांची अंमलबजावणी करीत, जिल्हा प्रशासनानेही पिंप्राळा रथोत्सवाची मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने रथोत्सव साजरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पिंप्राळ्यातील यात्रोत्सवही रद्द करण्यात आला होता. भाविकांना रथोत्सवाचे दर्शन घेता यावे, यासाठी फेसबुक लाइव्हद्वारे घरबसल्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दरवर्षी रथोत्सवानिमित्त मंदिर व रथाला रंगरंगोटी, तसेच विद्युत रोषणाई करण्यात येते. यंदा मात्र साध्या पद्धतीने रथाची सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे रथोत्सवानिमित्त शहर व परिसरातील पंचक्रोशीतील गावांमधून हजारो भाविक दर्शनासाठी पिंप्राळानगरीत दाखल होत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे भाविकांच्या आनंदावर विरजण पडले होते. मात्र, तरीदेखील काही नागरिकांनी सकाळी रथोत्सवाच्या पूजेला हजेरी लावून दर्शन घेतले.
इन्फो :
परंपरा टिकविण्यासाठी फक्त पाच पावले ओढला रथ
पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे विठू नामाचा जयघोष करीत फक्त पाच पावले रथ ओढण्यात आला. तत्पूर्वी पहाटे साडेपाच वाजता विश्वस्त रूपेश वाणी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीचा महाअभिषेक करून पूजा करण्यात आली. यावेळी रथावरील हनुमान, अर्जुन, गरुड व घोडे यांची संजय वाणी यांनी सपत्नीक पूजा केली. यानंतर सकाळी ८ वाजता रथोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल वाणी यांच्या हस्ते सपत्नीक रथाची महापूजा करण्यात आली व सव्वाआठ वाजता ग्रामस्थ मंडळी, गावातील लोकप्रतिनिधी व शांतता कमिटीचे सदस्य यांच्या हस्ते रथाची महाआरती करण्यात आली. यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी रथोत्सवात राबणारे मोहन वाणी, अक्षय वाणी, कल्पेश वाणी, श्याम जोशी, अरुण पाटील, रमेश महाजन, विष्णू पाटील, मयूर कापसे, विजय पाटील, अतुल बारी, पुरुषोत्तम सोमाणी, पीतांबर कुंभार, सुनील वाणी, योगेश चंदनकर, दुर्गेश वाणी, गिरीश वाणी, मयूर पंडित, चिराग वाणी, प्रमोद वाणी, तेजस चंदनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.