जळगावात गोरगरिबांच्या सामूहिक विवाहासाठी धर्मादाय कार्यालय सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:30 PM2018-03-27T18:30:36+5:302018-03-27T18:30:36+5:30
जिल्ह्यातील गोरगरिबांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता महेश प्रगती सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२७ : जिल्ह्यातील गोरगरिबांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता महेश प्रगती सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली.
साहाय्यक धर्मदाय आयुक्त चेतनकुमार तेलंगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. समाजातील गरजू, गरीब तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह लावणाºया व त्यांच्या खर्चावरील भार कमी करण्याबाबत धार्मिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाºया लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सामूहिक विवाहाचे आयोजन करण्याबाबत जिल्हास्तरीय समिती तयार करण्यात आली. त्यात रतन तानकू चौधरी, जुगल किशोर जोशी, मुकुंद विनायक मेटकर, श्रीकृष्ण बेहेडे, मुकेश श्रावण सोनवणे, धर्मराज राघो पाचोरेकर, शिवाजी ओंकार शिंपी, युवराज चंद्रकांत वाघ, महेश रतन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रास्ताविक अधीक्षक विश्वनाथ तायडे यांनी केले. सामूहिक विवाहाबाबत शासनाने काढलेल्या परिपत्रकाची माहिती नीलेश पाटील यांनी दिली. साहाय्यक धर्मादाय आयुक्त तेलंगावकर यांनी विश्वस्तांना सहभागी होण्याबाबत आवाहन केले. यावेळी पुढील नियोजनासाठी २ एप्रिल रोजी बैठक घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
यावेळी आर.टी.चौधरी, मुकुंद मेटकर, युवराज वाघ, बाळकृष्ण बेहेडे, मुकेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी तर आभार निरीक्षक आर.आर.पाटील यांनी मानले.