विचारविनिमय सभेतून चौबारीकरांनी केला ग्रामविकासाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 04:15 PM2020-03-02T16:15:17+5:302020-03-02T19:05:17+5:30

तरुणांच्या माध्यमातून गावात नवनवीन संकल्पना राबवून आगामी पाच वर्षात गावाची ओळख एक आदर्श गाव म्हणून व्हावी यासाठी विचारविनिमय सभा झाली.

Chaubarikar resolved rural development through deliberative meetings | विचारविनिमय सभेतून चौबारीकरांनी केला ग्रामविकासाचा संकल्प

विचारविनिमय सभेतून चौबारीकरांनी केला ग्रामविकासाचा संकल्प

Next
ठळक मुद्दे उपक्रम : आगामी पाच वर्षात आदर्श गाव करण्याचा केला निर्धारशिवस्मारक उभारण्यासाठीच्या जागेसंदर्भातही चर्चाविवाह पद्धतीत बदल होऊन आहेर (साडी) पद्धत बंद व्हावीगावातील सर्व तरुणांचा विवाहासंबंधी बायोडाटा जमा करून विवाह जुळणीसाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करावा

अमळनेर, जि.जळगाव : विविध योजना, सामाजिक उपक्रम तसेच तरुणांच्या माध्यमातून गावात नवनवीन संकल्पना राबवून आगामी पाच वर्षात गावाची ओळख एक आदर्श गाव म्हणून व्हावी यासाठी तालुक्यातील चौबारी येथे ग्रामदैवत मारुतीच्या मंदिरावर नुकतीच विचारविनिमय सभा झाली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. १९ फेब्रुवारी रोजी गडित केलेल्या समितीने शिव जन्मोत्सव उत्कृष्ट नियोजनाद्वारे पार पाडल्याने समितीचे अध्यक्ष सागर निकम तसेच सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवस्मारक उभारण्यासाठीच्या जागेसंदर्भातही चर्चा करण्यात आली. तसेच आगामी शिवस्मारकाची देखरेख, जागा मंजुरी, स्मारकासाठी परवानगी, निधी संकलन आदी कामांसाठी एक समिती गठित करण्यात आली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नको राजकारण, गावाला हवं समाजकारण’ हा उद्देश समोर ठेवून 'चौबारी विकास मंडळ' स्थापन करुन शंभरावर सभासद नोंदणी झाली. सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून गावाच्या विकासाचे नियोजन करण्यात आले.
ग्राम स्वच्छता, सुशोभिकरण, वृक्ष लागवड, जल संधारण, शेती विकास या विषयावर चर्चा होऊन याबाबतची समितीदेखील गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विवाह पद्धतीत बदल होऊन आहेर (साडी) पद्धत बंद व्हावी, गावातील सर्व तरुणांचा विवाहासंबंधी बायोडाटा जमा करून विवाह जुळणीसाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करावा, तसेच लग्नपत्रिका प्रत्यक्ष वाटप न करता अपघात टाळण्यासाठी मोबाइलच्या माध्यमातून पत्रिका पाठविण्यात याव्यात, असाही निर्णय घेण्यात आला.
यावेळी गावात ५० स्वयंसेवकांची निवड करून त्यांचा उपयोग समाजहितांच्या कामासाठी करायचा निर्णयही घेण्यात आला. गावात यात्रोत्सवाचे आयोजन करुन गावातील ज्येष्ठ- कनिष्ठ, सेवानिवृत्त, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शिक्षण क्षेत्र, शासकीय सेवेतील, आजी-माजी सरपंच, पोलीस पाटील, आधीपासून सालदारकी करणारे, मुकादम यांचा नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्याचाही निर्णय घेण्यात आला. ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे तरुणांना प्रशिक्षण व रोजगार कसा उपलब्ध होईल यावर सकारात्मक चर्चा होऊन तरुणांना यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.
यावेळी मधुकर भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षक मच्छिंद्र साहेबराव पाटील (चौबारीकर), अ‍ॅड. नितीन पाटील (धुळे), शिवसेना तालुकाप्रमुख विजय काशिनाथ पाटील, संजय त्र्यंबक पाटील, विठ्ठल कौतिक पाटील, यशवंत वेडू कढरे, प्रशांत गंजीधर पाटील, दुर्योधन हिलाल पाटील, लीलाधर निंबा पाटील, सागर निकम, रवींद्र मोरे तसेच शिव जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Chaubarikar resolved rural development through deliberative meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.