पारोळा येथे महाराणा प्रताप चौकात चौथरा उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 07:26 PM2018-06-11T19:26:05+5:302018-06-11T19:26:05+5:30
राजपूत समाजाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
लोकमत आॅनलाईन
पारोळा, जि.जळगाव, दि.११ : येथील नवनाथ मंदिराजवळील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या सभागृहात शहर व तालुक्यातील राजपूत पाटील, परदेशी, ठाकूर, राजपूत समाज बांधवांची बैठक नुकतीच झाली. त्यात पारोळा येथे महाराणा प्रताप चौकात चौथरा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाचे नेते चतुर भाऊसाहेब गिरासे अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठावर जी. आर. पाटील, बाळासाहेब पाटील, मोहाडीचे माजी सरपंच रामचंद्र पाटील, प्रकाश गुमानसिंग राजपूत, सावखेडाहोळचे माजी सरपंच बापू अर्जुन राजपूत माजी, बोदर्डे येथील सरपंच बाबूराव राजपूत, खेडीढोक येथील सरपंच चांगदेव राजपूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
महाराणा प्रताप जयंती १६ जूनला कशी साजरी करायची, महाराणा प्रताप चौकातील चौथरा बांधणे, राजपूत समाज मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी इमारत निधी तसेच समाजाच्या जात पडताळणीसाठी भिलदरी पॅटर्न कसा राबवायचा याबाबत दीपक गिरासे यांनी माहिती दिली.
बाळासाहेब पाटील यांनी प्रत्येक विषयांची माहिती स्पष्टपणे मांडून चारही विषयांसह समाज हितांचे अनेकविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाज संघटन महत्वाचे असल्याचे सांगितले. भिलदरी पॅटर्न आपण राबवू व प्रत्येकाला जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा निर्धार केला.
जी. आर. पाटील यांनी मनोगतात समाजाचे मंगल कार्यालय उभे राहिले तर समाजाला किती फायदे होणार हे सांगून मंगल कार्यालय बांधकामासाठी पहिला निधी माझा म्हणून एक लाख ११ हजार ११ रुपये जाहीर केले व चौथरा बांधकामासाठी पाच हजार एक रुपये रोख दिले. मंगल कार्यालय पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या जवळच असेन, असे स्पष्ट केले.