चोसाकाने मंडपाचे तीन लाख थकविले
By Admin | Published: January 21, 2017 12:29 AM2017-01-21T00:29:48+5:302017-01-21T00:29:48+5:30
चोपडा : मंडपाच्या संचालकांची तक्रार, २६ रोजी उपोषणाचा इशारा
चोपडा : चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी मंडप साहित्य पुरविण्यात आले होते. या मंडपाचे दोन लाख ८० हजारांचे बिल अद्यापही अदा करण्यात आलेले नाही. याबाबत शासन दरबारी फेºया मारूनही बिल न दिल्याने प्रजासत्ताकदिनी उपोषणास बसणार आहे
चोसाकाची पंचवार्षिक निवडणूक २०१५ मध्ये झाली. यात चोपड्यातील श्रीनाथ मंडपचे मालक गिरीश नारायणदास गुजराथी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार चोपडा यांच्या सांगण्यानुसार चोसाकास निवडणूककामी मंडप व इतर साहित्य भाड्याने पुरविले होते. या पुरवठा करण्यात आलेल्या साहित्याचे एकूण बिल २ लाख ८० हजार रुपये झाले होते. निवडणूक आटोपून जवळपास दीड वर्ष झाले, मात्र संबंधितांना अद्याप बिल अदा केलेले नाही. गुजराथी यांनी बिलाच्या मागणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत अमळनेर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार चोपडा, जिल्हाधिकारी जळगाव व चोसाका यांच्याकडे मागणी केली. मात्र बिल मिळत नसल्याने त्यांनी २६ रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिलेला आहे.
उपासमारीची वेळ : गुजराथी
मी या व्यवसायासाठी एका वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असून ते थकीत झाले आहे. माझ्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे श्रीनाथ मंडपचे मालक गिरीश गुजराथी यांनी सांगितले. (वार्ताहर)
स्वायत्त संस्थांची निवडणूक घेण्याचे काम शासन करते. मात्र त्याकामी लागणारी बिले त्या संस्थेने द्यायची असतात. आम्ही याबाबत चोसाकाला कळविले आहे.
-दीपक गिरासे,
तहसीलदार, चोपडा
चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनतर्फे बंदोबस्त पुरविण्यात आला होता. या बंदोबस्तापोटी कारखान्याकडे २ लाख ३६ हजार रुपये घेणे आहेत. मात्र ही बंदोबस्ताची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही, अशी माहिती चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
४चोपडा सहकारी साखर कारखान्याकडे यापूर्वी निवडणुकीसंदर्भात कुठले बिल थकले असे आतापर्यंत घडले नसल्याची चर्चा आहे.
४गेल्या काही वर्षांपासून चोपडा सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे आता थकबाकीदारांची बिले कशी देणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.