भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे चोपडय़ाचे बालवीर हनुमान मंदिर
By Admin | Published: April 10, 2017 01:49 PM2017-04-10T13:49:29+5:302017-04-10T13:49:29+5:30
साडे तीनशे वर्षापूर्वी स्थापन झालेले व चोपडा शहराचे ग्रामदैवत असलेले बालवीर हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे
शिवकालिन मंदिर : शिवाजी महाराजांच्या सैन्याचा होता मुक्काम
चोपडा, दि.10- साडे तीनशे वर्षापूर्वी स्थापन झालेले व चोपडा शहराचे ग्रामदैवत असलेले बालवीर हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी दहा हजार भाविकांसाठी भंडारा होत आहे.
चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवकालीन इतिहासात नोंद असलेली 350 वषार्पूवीर्चे ग्रामदैवत बालवीर हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार गेल्या वर्षी विधिवत पुजा करीत महामंडलेस्वर 1008 प पु संत बालयोगीजी महाराज यांचे हस्ते झाला. हनुमान जयंतीच्या निमित्ताने भाविकांची चोपडय़ाचे ग्रामदैवत असलेल्या बालवीर हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी होत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिर्णोद्धारासाठी 25 लाखांची लोकवर्गणी
350 वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी गेल्या वर्षी शहरातील विविध पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि हनुमान भक्तांनी लोकसहभागातून 25 लाख रुपयांच्या निधीचे संकलन करीत शिवाजी चौकात भव्य असे मंदिर उभारण्यात आले. या कलात्मक कार्यकुशलतेने उभारण्यात आलेल्या मंदिरामुळे शिवाजी चौकसह शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
शिवाजी महाराज यांच्या सैन्याचा मुक्काम
शिवकालीन असे हे मंदिर आहे. या मंदिरामुळे अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने ते चोपडय़ातील नागरिकांचे ग्रामदैवत ठरले आहे. शिवाजी महाराज जेव्हा चोपडा मार्गे सुरतला सैन्यासह जात होते, तेव्हा या मंदिराच्या पाठीमागे सैन्याने मुक्काम केला होता असे जाणकार मंडळी सांगतात.
भाविकांकडून शेंदूर अर्पण
या मंदिरातील मूर्ती चे खरे रूप गेल्या 100 वर्षापासून कोणीही पाहिले नाही. कारण प्रत्येक भक्त या हनुमान मूर्तीवर शेंदूर टाकत आला आहे. त्यामुळे मूर्तीचे खरे रूप भक्त पाहू शकत नव्हते. गेल्या वर्षी मंदिराचा जिर्णोद्धार केल्याने चोपडा येथील श्रद्धास्थान प.पू.महामंडलेश्वर योगीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार या मूर्तीवरील सर्व शेंदूर काढण्यात आला. त्यामुळे बालवीर हनुमान यांचे मोहक दर्शन भाविकांना झाले.
10 हजार भक्तांसाठी भंडारा
गेल्या वर्षापासून हनुमान जयंतीच्या दिवशी दहा हजार भक्तांसाठी भंडारा केला जातो.मंदिराच्या नव्या स्वरुपामुळे परिसर प्रसन्न झाला आहे. हनुमान जयंती असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात येत आहेत. हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी दिवसभर या मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहेत.