ग्राहकांसोबत बनवाबनवी, न्हावी येथील स्वस्त धान्य दुकान तीन महिन्यांसाठी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 11:55 AM2020-01-05T11:55:00+5:302020-01-05T12:07:17+5:30
तपासणीत आढळले अनेक दोष
जळगाव : यावल तालुक्यातील न्हावी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये अनियमितता व दोष आढळून आल्याने या दुकानाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
न्हावी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानाची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी २० डिसेंबर २०१९ रोजी तपासणी केली असता तेथे अनेक दोष आढळून आले. यामध्ये दुकानावर भाव फलक लावलेले नव्हते, वेळ दर्शविणारा फलक नव्हता, धान्याची उचल करूनही लाभार्थ्यांना धान्य वाटप केले नाही, अस्वच्छता, ई-पॉस मशिन दोन दिवस बंद होती, दप्तर अद्यायावत नाही, पंचनामा रजिस्टर नाही, साठ्यापेक्षा कमी धान्य वितरण करणे या सर्व कारणांमुळे सदर दुकानदारास नोटीस बजावली होती. मात्र खुलासा संयुक्तीक नसल्याने या दुकानाचा परवाना तीन महिन्यांसाठी निबंलित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी काढले. हे दुकान नजीकच्या स्वस्त धान्य दुकानास तत्काळ जोडण्याचाही उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.