आधार क्रमांक सीडिंगसाठी स्वस्त धान्य दुकाने सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:15+5:302021-01-08T04:49:15+5:30
जळगाव : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व ...
जळगाव : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक सीडिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यायातील स्वस्त धान्य दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
आठवडे बाजाराच्या दिवशीही दिवसभर उघडी राहणार दुकाने
जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ तसेच दुपारी ४ ते रात्री ८ या कालावधीत उघडी ठेवण्यात यावीत. या वेळेत धान्य वाटपाबरोबरच ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक सीड करणेची कार्यवाही करून घ्यावी. ज्या गावात आठवडी बाजार भरत, असेल अशा ठिकाणी आठवडी बाजाराच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्ण वेळ उघडी ठेवण्यात यावीत. विविध कारखाने, उद्योगधंदे असलेल्या क्षेत्रात त्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात यावीत. १५ जानेवारी रोजी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान संपन्न होणार असल्याने लाभार्थी मतदानासाठी येणार आहेत. या दिवशी सर्व रास्त भाव दुकानदार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल सिडींग करून घ्यावे.
लाभार्थी आधार आणि मोबाईल क्रमांक सिडींगसाठी आल्यावर त्वरीत आधार सिडींग करून घ्यावे. ३१ जानेवारीपर्यंत आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांना पुढील कालावधीचे धान्य देय होणार नसल्याने सदर कार्यवाही काळजीपूर्वक आणि विहीत वेळेत प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.