मुदतबाह्य गॅस सिलिंडरच्या शोधासाठी वितरकांकडील सिलिंडर्सची तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:11 PM2018-04-06T23:11:27+5:302018-04-06T23:11:27+5:30
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना
जळगाव: मुदतबाह्य गॅस सिलिंडरमुळे स्फोट होण्याच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. मात्र ग्राहक सिलिंडरची एक्सपायरी डेट बघत नाहीत. त्यामुळे स्फोट झालेल्या ठिकाणच्या सिलिंडर्सची तसेच वितरकांकडील सिलिंडर्सची जिल्हा पुरवठा अधिकाºयांमार्फत तपासणी व्हावी, अशी सूचना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत सदस्यांनी केली.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक शुक्रवारी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी बैठकीत केलेल्या विविध सुचना व तक्रारींची तत्काळ सोडवणूक होणे आवश्यक आहे. सदस्यांनी केलेल्या तक्रारी ज्या विभागाकडे प्रलंबित असतील, त्या विभागाच्या प्रमुखांची लवकरच बैठक घेऊन या तक्रारी सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पुरवठा विभागास दिल्या. या बैठकीस शासकीय सदस्य उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, अन्न व औषध विभागाचे व्ही. टी. जाधव, एम. एन. अय्यर, अ. ह. गुजर, दूरसंचार विभागाचे जे. एस. किनगे, वैद्यमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक सतिष अभांगे, आरोग्य विभागाचे डॉ. एम. पी. बावने, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रा. ना. घुले, पोलीस अधिक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी राजेंद्र होळकर, अशासकीय सदस्य रंजना पाटील, रविंद्र पाटील, नितीन बरडे, डॉ. अर्चना पाटील, पल्लवी चौधरी, धनंजय पाटील, अॅड मंजुळा मुंदडा, विकास महाजन, रमेश सोनवणे, विजय मोहरीर, शिवाजी अहिरराव, अ. फ. भालेराव, बाळकृष्ण वाणी, सतिष गडे, आण्णा धुमाळ, उज्वला देशपांडे, डॉ. प्रिती दोषी, सतिष देशमुख, कल्पना पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना गाडीलकर म्हणाले की, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत प्राप्त झालेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपल्या विभागाशी प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करावी. ज्या विभागाकडे तक्रारी प्रलंबित असतील त्या विभागाच्या प्रमुखांना तशी समज देण्याच्या सूचनाही त्यांनी पुरवठा विभागास दिल्या.
खाजगी बसेसच्या भाड्यावर नियंत्रण ठेवावे
खाजगी ट्रॅव्हल्सचालक इतर दिवशी ४००-५०० रूपये भाडे असताना रविवारी १२०० ते १५०० रूपये भाडे आकारतात, अशी तक्रार विजय मोहरीर यांनी केली. त्यावर आरटीओ जयंत पाटील यांनी यावर त्यांचे नियंत्रण नाही. परिवहन खात्याला याबाबत कळवू असे आश्वासन दिले. रिक्षाचालकांनी आरटीओंची परवानगी न घेता केलेल्या भाडेवाढीबाबतही आरटीओंनी कारवाई केली नसल्याबाबतही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.
या केल्या सूचना
या बैठकीत अशासकीय सदस्यांनी खाद्य पदार्थांमधील भेसळ तपासण्यासाठी शासकीय प्रयोग शाळेत प्रयोगशाळा तंत्रज्ञच नसल्याने तपासणी अडली आहे. दिवाळीपासून केलेल्या कारवाईबाबतचे अहवाल अद्यापही मिळालेले नाहीत. हा विषय जिल्हाधिकाºयांनी मार्गी लावावा. बस स्टॅन्डवरील स्वच्छतागृह महिला व लहान मुलांसाठी मोफत असावे. अनधिकृतरित्या वाहनांवर प्रेस लिहिणे, प्रमुख रस्त्यांवर शाळा, महाविद्यालय असल्याचे फलक लावणे, वाळु उपश्यास परवानगी दिलेल्या ठिकाणांवरुन वाळूची वाहतुक करणाºया वाहनांना विशिष्ट रंग द्यावा. शहरातील रस्त्यांवर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहतुकीस होत असलेल्या अडथळयाबाबत तक्रारी व सुचना केल्यात.