पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासा - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:00 PM2019-08-14T23:00:35+5:302019-08-14T23:01:11+5:30

राजकारणाचे गणित दिवसागणिक बदलते

Check out the loyalty of those coming to the party - Eknathrao Khadse | पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासा - एकनाथराव खडसे

पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासा - एकनाथराव खडसे

Next

जळगाव : पक्षात प्रवेश देताना तो पक्षाशी निष्ठावान राहील की नाही याची चाचपणी करा व मगच कोणालाही पक्षात प्रवेश द्या. कारण लोकसभा निवडणुकीवेळी तब्बल १६ पोलिंग एजंट हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निघाले होते. त्यामुळे त्यामुळे पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासली पाहिजे, असा सल्ला एकनाथराव खडसे यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संघटनात्मक बैठकीत मार्गदर्शन करताना दिला.
या वेळी त्यांनी सुरुवातीलाच ‘शक्ती’ या नावाप्रमाणेच केंद्र प्रमुखात जोश असायला हवा, असा सांगत कार्यकर्ता, शक्तीकेंद्र प्रमुख हेच विजयात महत्त्वाचे असल्याचे खडसे म्हणाले. जे शक्तीप्रमुख निष्प्रभ आहे, त्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होते, अशांना काढून टाका, दुसºयांना संधी द्या, असाही सल्ला त्यांनी दिला.
राजकारणाचे गणित दिवसागणिक बदलते
लोकसभेत यश मिळाले असले तरी दिवसागणिक राजकारणाचे गणित बदलते. याचे अनेक उदाहरणे आहे, असे सांगत खडसे यांनी स्वत:चे उदाहरण दिले. त्यात ते म्हणाले की, अगोदरच्या निवडणुकीत मला ३५ हजाराचे मताधिक्य होते. नंतर ते १० हजारावर आले. त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले होते. त्यामुळे गाफील राहू नका, असेही खडसे यांनी नमूद केले.
विधानसभेचे गणित वेगळे, गाफिल राहू नका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वावर जनतेला विश्वास असल्याने लोकसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्या वेळी मोदी एके मोदी हाच मुद्दा होता.परंतु, आता ही राज्याची निवडणूक आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नांना यात प्राधान्य असणार आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आपण कोठे कमी पडलो, याची चाचपणी करा. ज्याने आपल्याला मत दिले नाही, त्याचे मत पारड्यात पाडण्यासाठी काय करता येईल ते बघा, असा सल्ला एकनाथराव खडसे यांनी या वेळी दिला.
जिल्ह्यात एका दिवसात ताकद वाढली नाही
जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. ही ताकद एका दिवसात तयार झाली नाही तर ही पूर्वीच्या नेत्यांची मेहनत व अनेक वर्षांची निष्ठा याचे फलित असल्याचे खडसे यांनी नमूद केले.
‘देश मे सिर्फ ३७० चल रहा है....’
खडसे यांनी आपल्या भाषणात सध्या पक्षासाठी एकदम सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरातील ३७० कलम हटविल्याने सर्वत्र उत्साह आहे. ही हिंमत केवळ या दोघांनीच दाखविली आहे. त्यामुळे ‘देश मे सिर्फ ३७० चल रहा....’ असा उल्लेख खडसे यांनी आपल्या भाषणात केला. या सोबतच गिरीश महाजन, विजयराव पुराणिक यांनीही ३७० कलम हटविल्यानंतरच्या उत्साहाचा उल्लेख केला.
दोन्ही नेत्यांचे विरोधाभास निर्माण करणारे वक्तव्य
एककीडे एकनाथराव खडसे हे प्रवेश देताना निष्ठा तपासा असे सांगत असताना दुसरीकडे गिरीश महाजन यांनी तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षात घ्या, हा कामाचा नाही, तो कामाचा नाही, असे म्हणून नका, असे सांगितले. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे विरोधाभास निर्माण करणारे वक्तव्य कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारे आहे.

Web Title: Check out the loyalty of those coming to the party - Eknathrao Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.