बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर विक्री होणाऱ्या मांसची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:33+5:302021-01-13T04:40:33+5:30

जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या बर्ड फ्ल्यूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा ...

Check out the meat being sold on the background of bird flu | बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर विक्री होणाऱ्या मांसची तपासणी करा

बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर विक्री होणाऱ्या मांसची तपासणी करा

Next

जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या बर्ड फ्ल्यूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी दिले. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विक्री होणारे मांस पथकामार्फत तपासावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी राऊत यांनी या वेळी दिल्या.

देशातील काही राज्यांसोबतच महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

पोल्ट्रीफार्मचे सॅनिटायझेशन करुन घ्या

बर्ड फ्ल्यूचा संभाव्य प्रादुर्भाव होवू नये यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी दक्षता म्हणून आपल्या पोल्ट्रीफार्मचे सॅनिटायझेशन करुन घ्यावे, अशा सूचना या वेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या. जिल्ह्यातील कुठल्याही पोल्ट्रीमध्ये पक्षी मृत आढळून आल्यास त्वरीत पशुसंवर्धन विभागाला या विषयी कळवावे व असे पक्षी कुठेही विक्री करु नये, हे पक्षी इतर पक्षांमध्ये मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश या वेळी देण्यात आले. पोल्ट्रीफार्म काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी तसेच नगरपालिका क्षेत्रात जेथे मोठे मार्केट आहे तेथील विक्री होणारे मांस नगरपालिकेच्या पथकाने तपासण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्यात.

धोका नाही मात्र पथकांची निर्मिती

जिल्ह्यात सध्या अंदाजे २२६ पोल्ट्रीफार्म आहेत. या व्यावसायिकांशी पशुसंवर्धन विभागाने समन्वय साधून त्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करावे. जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पशुसंवर्धन विभाग आवश्यक ती दक्षता घेत असून यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्याम पाटील यांनी सांगितले. तसेच बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून तूर्त जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा धोका नसल्याची माहिती ए. डी. पाटील यांनी दिली.

Web Title: Check out the meat being sold on the background of bird flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.