कामाच्या गुणवत्ता तपासा, अन्यथा मक्तेदारावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:16 AM2021-05-22T04:16:09+5:302021-05-22T04:16:09+5:30
बैठक : महापौरांच्या अभियंत्यांना सूचना जळगाव : शहरात विविध ठिकाणी महापालिकेची विकास कामे सुरू असून, त्यांचा गुणवत्ता तपासा, ते ...
बैठक : महापौरांच्या अभियंत्यांना सूचना
जळगाव : शहरात विविध ठिकाणी महापालिकेची विकास कामे सुरू असून, त्यांचा गुणवत्ता तपासा, ते टिकाऊ राहील की नाही, याची तपासणी करा, जे मक्तेदार दर्जाहीन कामे करतांना आढळतील,त्यांच्यावर कारवाई करा,अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी शुक्रवारी मनपा अभियंत्यांच्या घेतलेल्या बैठकीत केल्या.
जळगाव शहरात मनपातर्फे दलित सुधारणा योजने अंतर्गत, तसेच मनपा निधी व जिल्हा नियोजन विभागाकडून आलेल्या निधीतून रस्ते, गटारी, स्वच्छता गृहे आदी विकास कामे वेगाने सुरू आहेत. या मध्ये प्रभाग १ ते १० मधील विकास कामांवर देखरेख ठेवण्यासाठी अभियंता विकास सोनवणे व प्रभाग ११ ते १९ मधील कामांवर लक्ष ठेवण्यासाठी अभियंता नरेंद्र जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन यांनी या कामांबाबत या दोन्ही अभियंत्यांची त्यांच्या दालनात बैठक घेतली. यावेळी महापौरांनी मक्तेदार कामाच्या ठिकाणी मटेरियल, सिमेंट,खडी व इतर बांधकाम साहित्य वापरत आहे की नाही याची पाहणी करा, खरेदी केलेल्या बांधकाम साहित्याची नोंद ठेवा, दररोज किती मटेरियल लागले याची नोंद करा आदी दर्जेदार काम होण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच जे मक्तेदार कामात भ्रष्टाचार किंवा दर्जाहीन कामे करतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचीही सूचना केली. तर या कामांचा दर आठवड्याला अहवाल सादर करण्याच्या सुचना ही केल्या.