जळगावात मिठाई दुकानावर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:49 PM2018-11-07T12:49:33+5:302018-11-07T12:49:46+5:30
खवा, माव्यासह शेव बर्फीच्या एकूण ४५ नमुन्यांची तपासणी
जळगाव : अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने मंगळवारी सिंधी कॉलनीतील मे.जय जोगणिया स्वीटस अँड उपहारगृह या मिठाई दुकानावर तपासणी करून खाद्य पदार्थांचे नुमने घेतले. दरम्यान, सणासुदीच्या काळात दोन महिन्यांमध्ये एकूण ४५ नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतले आहे. सुट्टीच्या काळातही दोन अधिकारी तपासणीसाठी सज्ज राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने तपासणी केली जात असून गेल्या आठवड्यात औद्योगिक वसाहत परिसरात खाद्य तेल व खाद्य पदार्थांचे नुमने घेतल्यानंतर मंगळवारी पुन्हा सिंधी कॉलनीतील मे.जय जोगणिया स्वीटस अँड उपहारगृह या दुकानावर उघड्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या कलाकंद बर्फी व शेव असे दोन खाद्य पदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा अधिकारी अनिल गुजर यांनी तपासणीसाठी घेतले. सदरचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून नमुन्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. तपासणीदरम्यान दुकान मालकास स्वच्छते बाबतही सूचना देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
४५ नमुन्यांची तपासणी
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आॅगस्ट महिन्यांपासूनच तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून गणेशोत्सव, दुर्गात्सव, दसरा यासह दिवाळीच्या काळात सहायक आयुक्त (अन्न) वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी, विवेक पाटील, अनिल गुजर, सुवर्णा महाजन यांनी ४५ नमुने तपासणीसाठी घेतले असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
घेतलेले नमुने
खवा, मावा, मिठाई - १५
मैदा, बेसण, आटा - १२
गावराणी तूप, वनस्पती तूप, खाद्य तेल, फरसाण - १८
दोन अधिकारी सज्ज
दिवाळीच्या काळात सुट्या असल्या तरी भेसळयुक्त व निकृष्ठ पदार्थांची विक्री होऊ नये म्हणून प्रशासनाने सज्जता ठेवत सुट्टीच्या काळात दोन अधिकारी लक्ष ठेवून असल्याचेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.