केमिस्ट बांधव लसीकरणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:14 AM2021-05-17T04:14:26+5:302021-05-17T04:14:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या काळात अखंडितपणे काम करीत असलेल्या औषध विक्रेते बांधवांचे लसीकरण होत नसल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या काळात अखंडितपणे काम करीत असलेल्या औषध विक्रेते बांधवांचे लसीकरण होत नसल्याने त्यांचे कधी लसीकरण होईल, असा सवाल डिस्ट्रिक्ट मेडिसीन डीलर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे. लसीकरण होत नसेल तर दुकाने बंद ठेवावी का, असा सवाल संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग उद्भवला तेव्हापासून औषध विक्रेते बांधव दररोज काम करीत आहेत. यंदादेखील फेब्रुवारी महिन्यापासून संसर्ग वाढल्याने अनेक केमिस्ट बांधवांनादेखील संसर्ग झाला, मात्र अजूनही त्यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात नाही.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्कर यांच्याप्रमाणे औषध विक्रेतेदेखील दररोज सेवा देत आहेत. मात्र औषध विक्रेत्यांना लस देण्याविषयी हालचाली नसल्याने त्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे. औषध विक्रेते कोरोना काळात काम करीत नाहीत का, असा सवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे औषध विक्रेत्यांचा दररोज वेगवेगळ्या नागरिकांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांना तत्काळ लस देण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.