छटपूजा : विश्वशांती, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:34 PM2018-11-13T22:34:41+5:302018-11-13T22:37:44+5:30
उत्तर भारतीय संघ छट पूजा समितीतर्फे आयोजन
जळगाव : उत्तर भारतीय संघ छट पूजा समितीतर्फे आयोजित छट पूजेदरम्यान उत्तर भारतीयांतर्फे सुख, समृद्धी, समाधान,आरोग्यासह विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. शहरातील ७ ते ८ हजार समाजबांधवांनी या उत्सवात सहभाग नोंदविला.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर सीमा भोळे, प्रभाकर सोनवणे, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, अनंत जोशी, प्रशांत नाईक, डॉ. विश्वनाथ खडके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याहस्ते पूजा करण्यात येऊन सोहळ््यास सुरुवात झाली.
भजन व लोकगीते सादर
संध्याकाळी ५ वाजेपासून ते सूर्यास्तापर्यंत छटी मातेची ही पूजा करण्यात आली. यावेळी महिलांनी पाण्यात उभे राहून हातात पूजेची थाली धरत सूर्याला नमन केले मावळत्या सूर्याला यावेळी अर्घ्य देण्यात आले. पहिली पूजा व अर्घ्य हे मंगळवारी झाले. पूजेतून षष्ठी मातेची स्तुती करण्यात आली व भजन कीर्तन तसेच पारंपरिक लोकगीते, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. गायिका प्रियंका मौर्या (मुंबई) यांनी गीत, भजन सादर केले.
रात्रभर सत्संग, भजन होऊन दुसऱ्या दिवशीदेखील पूजा करण्यात येणार आहे. यात दुसरे अर्घ्य बुधवारी पहाटे ५ वाजेपासून ते सूर्याेदयापर्यंत पूजा करून देण्यात येणार आहे. त्यानंतर ज्यांचे उपवास आहे ते गरम दूध किंवा चहा सेवन करून आपला उपवास सोडतील.
दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
छट म्हणजे सूर्य, सूर्यापासूनच सृष्टीची उत्पत्ती असून तेच सर्वांचे पालन पोषणकर्ते आहे म्हणून सूर्यदेवाची आराधना यात केली जाते. यावेळी प्रत्येकाने आपल्या आरोग्य, सौभाग्य, समृद्धी, दीर्घ आयुष्य, पूत्रप्राप्ती, यश-कीर्ती, कष्ट निवारण करण्यासाठी, मनोकामनापूर्ती तसेच शांतीसाठी या वेळी प्रार्थना करण्यात आली.
चतुर्दशीपासून या पर्वास सुरूवात झाली. यादिवशी तलावावर स्नान करीत घरातील साफसफाई केली जाते. तसेच दुधी भोपळ्याची भाजी खाण्यात येते. तर पंचमीस गुळाची खीर खाऊन रात्रीपासून निर्जला उपवासाची सुरुवात झाली. त्यानंतर षष्ठीला फळे, दीपदान यांनी सूर्याची पूजा करण्यात आली.
या वेळी संस्थापक अध्यक्ष ललन यादव, उपाध्यक्ष मनोहर साहनी, कार्याध्यक्ष चंदन साहनी, सचिव रामनरेश मौर्या, अमित यादव, कृष्णा चौधरी, दयाशंकर विश्वकर्मा, रमाकांत गौड, यशवंत मिश्रा, राजेश यादव, प्रकाश सिंग, राजेश सहानी, राजेश विश्वकर्मा, रणधिर सिंह आदी उपस्थिती होते. गेल्या १७ वर्षांपासून ही पूजा मेहरुण तलावावर सामूहिकरीत्या आयोजितकेलीजाते.सूत्रसंचालन रामनरेशमौर्यायांनीकेले.
३६ तासांचे निर्जला व्रत व सूर्यास अर्घ्य
समितीच्यावतीने मंगळवारी शहरातील उत्तर भारतीय समाजबांधवांसाठी मेहरुण तलावावरील गणेश घाटावर छट पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उत्तर भारतीयांतर्फे ३६ तासांच्या निर्जला व्रत करीत प्रार्थना करण्यात आली. पंचमीच्या रात्रीपासून सुरू झालेले हे ३६ तासांचे निर्जला व्रत बुधवारी पहाटे सूर्याेदया प्रसंगी सूर्यास अर्घ्य देऊन पूर्ण होईल.
दिव्यांनी उजळला मेहरुण तलाव
गणेश घाटावर यावेळी समाजबांधवांसाठी मंडप उभारण्यात आले होते. त्याचप्रमाणे आकर्षक रोशणाई करण्यात आली होती. यावेळी दीपदान करण्यात आले. दिव्यांनी गणेश घाट व मेहरुण तलाव परिसर उजळून निघाला.