मुख्यमंत्र्यांनी मतांचा जोगवा मागण्यासाठी येऊ नये : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:00 PM2018-07-27T13:00:31+5:302018-07-27T13:01:54+5:30
संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता
जळगाव : मराठा आरक्षणावरून वातावरण तापले असून जळगावात मात्र मराठा समाजाने शांतता राखून संयम बाळगलेला असला तरीही स्फोटक परिस्थिती आहे. आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक असताना मुख्यमंत्री मतांचा जोगवा मागण्यासाठी जळगावात आल्यास मराठा समाजातील युवकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचा इशारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरूवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आला.
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असेही जाहीर करण्यात आले. यावेळी डॉ.राजेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, अॅड. सचिन पाटील, ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, राजेश पाटील, नंदू पाटील, गोपाल दर्जी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.राजेश पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री २९ रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे ऐकीवात आहे. मराठा समाजाची विनंती आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावरून महाराष्टÑात जाळपोळ व उद्रेकाचे वातावरण झाले आहे. प्रथम तो ज्वलंत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे.
केंद्राने कलम ३६८चा वापर करावा
गोपाल दर्जी म्हणाले की, जिल्ह्यातील मराठा बांधवांनी अजूनही विध्वंसक कार्य केलेले नाही व करणारही नाही. कोणी समाजकंटक समाजाला अशा कृत्यांनी बदनाम करत असेल तर त्याला समाज उत्तर देईल. केंद्र सरकार कलम ३६८ चा वापर करून मराठा समाजाला सहज आरक्षण देऊ शकते. त्याचा विचार करावा, अशी मागणी केली.
आत्महत्या करू नका
मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे प्रयत्न होत आहेत. मात्र कोणीही आत्महत्या करू नये. ज्यांनी समाजाला वेठीस धरले आहे, त्यांना पुरून उरा. २०वर्षांपासून हा लढा सुरू असल्याचे भिमराव मराठे यांनी सांगितले. जो संयम ठेवण्याचा सल्ला द्यायला जाईल, त्याच्यावरच समाजबांधवांचा रोष ओढावतो आहे.
...संतप्त युवकांना समजावणे कठीण जाईल
जळगाव शहरात मनपा निवडणूक असल्याने मतदान व आचारसंहितेचा विचार करून मराठा समाजाने शांतता व संयम बाळगला आहे. मात्र युवकांमध्ये प्रचंड संताप आहे. अशा परिस्थितीत जर मुख्यमंत्री समस्या सोडविण्यासाठी येण्याऐवजी मतांचा जोगवा मागण्यासाठी येतील तर या संतप्त युवकांना समजावणे कठीण जाईल. शांतता भंग होईल. अनुचित प्रकार घडू शकतो, अशी शंका डॉ.राजेश पाटील यांनी व्यक्त केली.
आमदारांचा राजीनाम्याचा विषय वैयक्तिक
मराठा आरक्षणाच्या विषयावर जिल्ह्यातील मराठा आमदारांनी राजीनामा देण्याची मागणी करणार का? या प्रश्नावर डॉ.राजेश पाटील यांनी सांगितले की, राजीनामा देणे हा आमदारांचा वैयक्तिक व नैतिकतेचा विषय आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांत्वनासाठी जाण्याची गरज...
भीमराव मराठे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मतांचा जोगवा मागण्यासाठी येण्याऐवजी मराठा आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या काकासाहेब शिंदे या युवकाच्या घरी शिंदे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी जायला हवे होते. या युवकाच्या घरी एकही शासकीय प्रतिनिधी गेलेला नाही.