...अन् मुख्यमंत्र्यांच्या मार्गात आली मोठी अडचण; ऐनवेळी दौऱ्यात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 11:42 AM2020-02-16T11:42:22+5:302020-02-16T15:03:13+5:30
राष्टÑवादीच्या बैठकीतही खड्ड्यांचा विषय
जळगाव : जळगाव शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शनिवारी तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजित दौºयातच बदल करण्याची वेळ आली. मुख्यमंत्र्यांना या खड्डेमय रस्त्यातून न्यावे कसे, असा प्रश्न यंत्रणेसमोर उभा राहिला व ऐनवेळी दौराच बदलविला. दुसरीकडे जळगाव- औरंगाबाद रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बसला व त्यांनी या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करीत शहरवासीयांच्या दुखºया नसवर जणू बोट ठेवले आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षांच्या दोन्ही नेत्यांना रस्त्याचा फटका बसल्याने आतातरी संबंधित यंत्रणेला जाग येईल का ? नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रस्ता दुरुस्तीची संधीच नाही
रस्त्यांची बिकट स्थिती असताना राज्यातील सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे दोघेही प्रमुख शनिवारी शहरात आले. शुक्रवारी संध्याकाळी ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा रद्द झाला व ते मुंबई येथून थेट जळगावला येणार असल्याचे ठरले.
मुख्यमंत्र्याच्या जळगाव दौºयात ते विमानतळावरून जैन हिल्स येथे मोटारीने जाणार असल्याचे नियोजित होते. त्यासाठी या मार्गावर पोलीस यंत्रणाही तैनात करण्याचे नियोजन झाले. मात्र रस्त्याची बिकट स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांना या मार्गाने नेणे योग्य होणार नाही म्हणून दौºयातच बदल करून त्यांना विमानतळावरून जैन हिल्स येथे हेलिकॉप्टरद्वारे न्यावे लागले.
शरद पवारांची नाराजी
दुसरीकडे जळगाव-औरंगाबाद रस्त्याबाबत शरद पवार यांनी चोपडा येथे तर जाहीर नाराजी व्यक्त केली. ‘या मार्गाने येणे म्हणजे डॉक्टर सोबत ठेऊनच प्रवास करणे गरजेचे आहे’ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
नेते एकाच प्रवासात असे म्हणत असतील तर जळगावकर किती वर्षांपासून हा त्रास सहन करीत आहे. त्याची दखल घेतली जात नसल्याने आता सत्ताधाऱ्यांच्या दौºयानंतरही या रस्त्याचे भाग्य उजळेल की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
समस्यांचा डोंगर
जळगाव-औरंगाबाद रस्त्याची दुरवस्था असण्यासह शहरातील विविध विकास कामेही रखडले आहे. त्यात शहरांमधील रस्त्यांचीही बिकट स्थिती आहे. शहरातील या थांबलेल्या विकासाचा मुद्दा महापौर भारती सोनवणे यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मांडत अतिरिक्त निधीची मागणी केली.
राष्ट्रवादीच्या बैठकीतही ‘खड्डे’
संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीतही शहरातील खड्ड्यांचा विषय निघाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी जळगाव शहरात खड्ड्यांचा विषय गंभीर असल्याचे पवार यांच्यासमोर बोलून दाखविले. खड्ड्यांमुळे रस्त्यांची मोठी बिकट स्थिती झाल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनीच शहरातील खड्डे बुजल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.