मुख्यमंत्र्यांनी घेतला पालकमंत्र्यांकडे खान्देशी भोजनाचा आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:30 PM2019-08-24T22:30:38+5:302019-08-24T22:30:42+5:30
जामनेर : खडसें व संभाजीराजे भोसलेंचीही हजेरी
जामनेर : महा जनादेश यात्रेनिमित्त येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री सभेनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी अस्सल खान्देशी भोजनाचा आस्वाद घेतला. माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचेही बऱ्याच वर्षांनी जामनेरला पाय लागले व तेही महाजन यांच्या निवासस्थानी त्यामुळे हा दुर्मीळ योगच जुळून आल्याचे म्हटले जाते.
या स्नेहभोजनाचा लाभ फडणवीस, महाजन यांच्यासोबत खडसे, आमदार सुरजितसिंग ठाकूर आदींनी घेतला. रावेर येथील एक कार्यक्रम आटोपून परतणारे खासदार संभाजीराजे भोसले जामनेरला आले व त्यांनीही या स्नेहभोजनात हजेरी लाऊन राजकीय व काही अराजकीय गप्पांमध्ये रंगत आणली. मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
असा होता मेनू
भरीत, शेवभाजी, भेंडी भाजी, बाजरीची भाकरी, चपाती, ग्रीन सलार्ड व सोबतीला रबडी, काजू कतली व जिलेबी असल्याने या भोजनावळीतून गोडवा दृढ झाला.
कुराणची मराठी प्रत दिली भेट
शहरातील मुस्लीम कार्यकर्त्यांनी संधी साधत फडणवीस यांना कुराणची मराठी प्रत भेट दिली.
भुसावळ येथे हॉटेलात मुक्काम
जामनेर येथील सभा व जेवण आटोपून शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरणगाव महामार्गावर असलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम केला. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. दरम्यान शनिवारी विदर्भाकडे यात्र रवाना होत असताना भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अजय भोळे यांना फोन करून व सोबत त्यांचा खासगी कुक सतीश यांना त्यांच्या घरी पाठवून भरीत व भाकरी, कोशींबीर तसेच मेथी मटरची भाजी मागविण्यात आली होती.