जळगाव मनपाला मिळणा-या 25 कोटीच्या निधीत मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:13 PM2017-12-12T12:13:51+5:302017-12-12T12:17:20+5:30

17 रोजी जिल्हाधिका-यांची मुख्यमंत्र्यासोबत बैठक

Chief Minister's intervention in funding of 25 crore fund | जळगाव मनपाला मिळणा-या 25 कोटीच्या निधीत मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

जळगाव मनपाला मिळणा-या 25 कोटीच्या निधीत मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

Next
ठळक मुद्देमनपाकडून मागविली माहिती सत्ताधारी व विरोधकांमध्ये रस्सीखेच कायम

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12 - मनपासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 25 कोटींच्या निधीचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाही. 25 कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करताना सत्ताधारी खाविआ व मनसेच्या नेत्यांनी भाजपा आमदार व नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याची तक्रार जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेवून मुख्यमंत्र्यांनी 25 कोटीच्या निधीबाबत मनपाचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना पत्र पाठवून निधीबाबतची माहिती मागितली आहे. 
तसेच त्यांना 16 व 17 डिसेंबर रोजी नागपुर येथे बोलावून घेतल्याची माहिती मनपाच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीड वर्षांपुर्वी जळगाव दौ:यावर आले असता. त्यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. मात्र अद्यापही या निधीचा तिढा सुटत नाही. 25 कोटी रुपयांच्या निधीतुन जी विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये भाजपा नगरसेवकांचे वार्ड डावलण्यात आले असून, नगरसेवक व आमदारांनी विश्वासात न घेतल्याची तक्रार आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाशिक येथे झालेल्या भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यादरम्यान केली होती.
यावेळी भाजपाचे काही नगरसेवक देखील उपस्थित होते. तसेच शनिवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जैन हिल्सवर आले असता. त्यांच्याकडेदेखील नगरसेवकांनी हीच तक्रार केली होती.
मुख्यमंत्र्यांनी घेतली तक्रारीची दखल
भाजपा नगरसेवक व आमदारांनी केलेल्या तक्रारीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, 25 कोटी रुपयांच्या निधीच्या नियोजनाची माहिती प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी मागितली आहे. या संदर्भाचे पत्र प्रभारी आयुक्तांना सोमवारी प्राप्त झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच निधीच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रभारी आयुक्तांना 16 व 17 डिसेंबर रोजी नागपुर येथे बोलावून घेतले आहे. 
25 कोटीची कामे पुन्हा रखडण्याची चिन्हे
मुख्यमंत्र्यां प्रभारी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात महापौरांकडून 25 कोटीच्या कामांसाठी केलेल्या नियोजनाची माहिती घेऊन ती पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रभारी आयुक्तांनी महापौर ललित कोल्हे यांना पत्र पाठवून नियोजनाची लिखीत माहिती दोन दिवसात मागितली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने. या निधीतुन होणारी कामे पुन्हा रखडण्याची भिती आहे.
सत्ताधारी व विरोधकांमध्ये रस्सीखेच कायम
 मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केल्यानंतर, खाविआने 25 कोटीच्या निधीबाबत पहिली यादी पाठविली. त्यानंतर भाजपा नगरसेवकांनी आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडे तक्रार करुन भाजपा नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला होता. 
 निधी प्राप्त झाल्यानंतर संबधित निधीतुन सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील कामे करावीत अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली होती. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिका:यांचा समावेश होता. मात्र हा निधी महापालिकेसाठी आला असल्याने या निधीतुन महानगर पालिकेने काम करावीत असा निर्णय पालकमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत समिती सदस्यांनी घेतला होता. 
 महापालिकेकडे 25 कोटीच्या कामांचे नियोजन आल्यानंतर महापौर, उपमहापौर, मनपा स्थायी समिती सभापतींचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली. या समितीने 25 कोटींच्या कामांचे नियोजन केले. यामध्ये 6 कोटींच्या कामातुन गटारींचे तर 10 कोटीच्या कामातुन शहरात एलईडी लावण्यात येणार होते. मात्र यामध्ये आमदार सुरेश भोळे यांनी विस्तारीत भागांमध्ये गटारींचे कामे व्हावीत यासाठी गटारींसाठी 3 कोटी रुपयांचा निधी वाढवून घेण्याचा सूचना दिल्या होत्या. 
 विस्तारीत भागातील गटारींसाठी वाढ करण्यात आलेल्या निधींची कामे भाजपा नगरसेवकांच्या वार्डातील नसून, सत्ताधारी नगरसेवकांच्याच वार्डात होत असल्याची तक्रार भाजपा नगरसेवकांनी मुख्यमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे केल्यानंतर हा वाद वाढला आहे.
 

Web Title: Chief Minister's intervention in funding of 25 crore fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.