जळगाव मनपात युतीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक - सुरेशदादा जैन यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:56 AM2018-03-04T11:56:43+5:302018-03-04T11:56:43+5:30
राजकीय घडामोडींना वेग
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ४ - आगामी काळात राज्यात भाजपा व शिवसेनची युती झाली नाही तरी जळगाव महापालिकेत युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकुलता दर्शविली असून या बाबत बैठक घेवून निर्णय घेऊ असे त्यांनी आजच आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या साक्षीने बुलढाणा येथे ही चर्चा झाली असून विकासासाठी ही बाब आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
महापालिका अंतर्गत कोकीळगुरूजी अॅक्वा स्पा जलतरण तलावाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन सुरेशदादा यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ललित कोल्हे होते. यावेळी आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपमहापौर गणेश सोनवणे, मनपातील विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. एकीकडे प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले असून दुसरीकडे राजकीय पक्षांकडूनही तयारी सुरु झाली आहे. सुरेशदादा जैन हे आज बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रम आटोपून जलतरण तलावाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी येथे दिली.
युतीच्या चर्चेसाठी बैठक घेण्याचीही तयारी
जलतरण तलावाच्या या उपक्रमात कोणतीही मते मतांतरे नाहीत. येथे सर्वपक्षीय आहेत त्यांनीही विघ्न आणणार नाही अशी ग्वाही दिली. ही बाब अतिशय चांगली आहे. महापालिकेची येणारी निवडणूक भाजपा-शिवसेना युती करून लढवू असे आपण बुलढाणा येथे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. त्यांनीही त्यास अनुकुलता दर्शविली. याबाबत बैठक घेण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील साक्षीदार असल्याचे सुुरेशदादांनी यावेळी सांगितले. आपण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन एकत्र येऊन सकारात्मक निर्णय घेऊ शकतो असेही सुरेशदादा म्हणाले.
महापालिकेची सप्टेंबर महिन्यात निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता गती आली आहे. निवडणुकीचा एक टप्पा म्हणजे प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित झाला आहे. प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. महापालिकेत सद्य स्थितीत खाविआ, मनसे, राष्टÑवादी कॉँग्रेस, जनक्रांती अशी आघाडी आहे.
मनसेने सहकार्य केल्याने ललित कोल्हे हे सध्या महापौर आहेत. राष्टÑवादी काँग्रेसने यापूर्वी महाआघाडी तयार करावी असा प्रस्ताव सुरेशदादांकडे व्यक्त केला होता. दिलीप वळसे पाटील यांनी याप्रश्नी सुरेशदादा जैन यांची भेटही घेतली होती. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शहराच्या दौºयावर आले असता त्यांनीही मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरेशदादांची भेट घेतली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून मनपा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरेशदादांनी जलतरण तलावाच्या उद्घाटनप्रंगी केलेले वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. तलावाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे दोन्ही आमदार, मनताील विरोधीपक्षनेते, बांधकाम व्यावसायिक श्रीराम व श्रीकांत खटोड उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत सुरेशदादा यांनी हे वक्तव्य केले.
शिवाजी उद्यान विकसीत व्हावे
शिवाजी उद्यान जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून विकसीत व्हावे असा प्रस्ताव होता. मात्र त्यावेळी काही मतेमतांतरे होती. मात्र आता तशी परिस्थिती नाही.ती जुनी फाईल पुन्हा उघडून प्रस्ताव जैन समुहाला द्यावा. भाऊंचे उद्यान, गांधी उद्यानासारखे हे उद्यानही सुशोभित व्हावे व शहराच्या वैभवात भर पडावी अशी अपेक्षाही सुरेशदादांनी व्यक्त केली.
२५ कोटी मिळाले मात्र...
शहरास पूर्व वैभव मिळावे असे आपले प्रयत्न आहेत. आज २५ कोटींचा निधी प्राप्त होऊनही तो वापरता आला नाही तेच जर चांगला समन्वय असता तर अधिक विकास होऊ शकला असता असेही सुरेशदादा म्हणाले.