महाजन, रावळांना मुख्यमंत्र्यांचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:21 AM2019-06-09T00:21:53+5:302019-06-09T00:22:07+5:30

खात्यांमध्ये वाढ, पालकमंत्रिपदाची जबाबदारी या दोन्हीसाठी मंत्री पात्र होते; त्यांचा प्रतीक्षाकाळ मोठा आहे, महापालिका आणि लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचेच फळ ; डॉ.सुभाष भामरे यांच्या पदरी मात्र निराशा

Chief Minister's Power for Mahajan, Rawal | महाजन, रावळांना मुख्यमंत्र्यांचे बळ

महाजन, रावळांना मुख्यमंत्र्यांचे बळ

Next

मिलिंद कुलकर्णी
जळगाव आणि धुळे महापालिका निवडणुका भाजपने जिंकण्यात संपूर्ण रणनीती महाजन आणि रावळ या दोघांची होती. लोकसभा निवडणुकीतही खान्देशातील चार जागांसंबंधी नियोजन दोघांनी केले होते. नंदुरबार आणि धुळ्याची जबाबदारी रावळ यांनी समर्थपणे पेलली तर जळगाव, रावेर महाजन यांनी लिलया सांभाळले. जळगावात पक्षांतर्गत वादळ येऊनही परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देण्याचे कसब त्यांनी दाखविले. विधानसभा निवडणुका या दोघांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार हे आता निश्चित आहे.
भाजपमधील नेतृत्वाची कूस आता खऱ्या अर्थाने बदलली आहे. एकनाथराव खडसे हे खान्देशचे एकमुखी नेतृत्व मानले जात होते. त्यांची जागा आता गिरीश महाजन यांनी घेतली आहे. पालकमंत्रीपदी नियुक्ती हा त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब आहे.
खडसे हे १९९० मध्ये पहिल्यांदा आमदार झाले तर महाजन हे १९९५ मध्ये झाले. शिवसेना-भाजपच्या पहिल्या युती सरकारमध्ये खडसे हे मंत्री झाले. परंतु, पहिलीच वेळ असल्याने महाजन यांचा विचार होणे शक्य नव्हते. खडसे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. खडसे यांचाही मंत्रिमंडळ प्रवेश उशिरा झाला होता. परंतु, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असल्याने त्यांना अर्थ, पाटबंधारे, उच्चशिक्षण यासारखी वजनदार खाती मिळाली होती. २००९ ते २०१४ या पाच वर्षांत खडसे विरोधी पक्षनेते होते आणि खºया अर्थाने राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. दुसऱ्यांदा युती सरकार आल्यावर महसूल, कृषी, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास अशी तब्बल १२ खाती त्यांच्याकडे आली. मुख्यमंत्र्यांखालोखाल खडसे यांचे स्थान होते. परंतु, रामायण घडले आणि तीन वर्षे खडसे वनवासात आहेत.
मुख्यमंत्र्यांचे वय पाहता समवयस्क मंत्री आणि आमदारांशी त्यांचे सूर चांगले जुळतात असे दिसून आले. गिरीश महाजन यांना खºया अर्थाने कौशल्य, कसब आणि कर्तबगारी दाखविण्याची संधी या पावणेपाच वर्षांतच मिळाली. ‘संकटमोचक’ म्हणून प्रतिमानिर्मिती, निवडणुकांमधील आश्चर्यकारक विजय हे त्यांचे वैशिष्टय राहिले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीची सूत्रे खान्देशपुरती खडसे यांच्याकडे होती. धुळ्यात अनिल गोटे, नंदुरबारात डॉ.विजयकुमार गावीत, पाचोºयात डॉ.उत्तमराव महाजन यांना भाजपची उमेदवारी त्यांनीच देऊ केली. आता हीच जबाबदारी महाजन यांच्याकडे चालून आली आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीत संपूर्ण उत्तर महाराष्टÑ ‘भगवा’ करण्याचे आव्हान त्यांनी पेलून दाखविल्याने हे घडले आहे.
महाजन पालकमंत्री झाले, रावळांकडे अन्न व नागरी पुरवठा खाते आले म्हणजे आता खान्देशचा कायापालट झाला, असे वातावरण तयार करण्यात आले असले तरी त्यात काहीही अर्थ नाही. मुळात अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. एक बरे झाले की, स्थानिक मंत्री राहिल्याने प्रश्नांची जाण त्यांना आहे. कुणाच्या सल्ला घेण्याची आवश्यकता त्यांना भासणार नाही. फक्त लाभार्र्थींचा गोतावळा त्यांना काही अंतरावर ठेवावा लागेल. अन्यथा ही मंडळी त्यांच्या नावाने भलेबुरे करेल आणि त्याची नोंद महाजन यांच्या खात्यावर घेतली जाईल. एवढी काळजी घेतली तरी पुरे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मधील मंत्री गिरीश महाजन व जयकुमार रावळ यांना मोठे गिफ्ट मिळाले. महाजन यांना तर कधीची प्रतीक्षा होती, परंतु, रावळांना मात्र अनपेक्षित धक्का होता. मंत्रिमंडळ विस्तार झाला तरच हे खाते पुन्हा जाईल, अन्यथा तीन वजनदार खात्यांचे मंत्री म्हणून रावळ यांची नोंद होईल. अर्थात या दोघांचा प्रतीक्षा काळ मोठा होता आणि त्यांनी केलेली कामगिरी निश्चितच दखलपात्र होती. रावळांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळाले नाही. महाजन यांनाही नंदुरबार, नाशिकचे पालकत्व दिले, पण जळगावसाठी त्यांना तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

Web Title: Chief Minister's Power for Mahajan, Rawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.