राज्याच्या मुख्य सचिवांनी दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:51 AM2021-02-05T05:51:40+5:302021-02-05T05:51:40+5:30
जळगाव : भुसावळ येथील मालती नेहते या वृद्ध महिलेच्या मृत्यूप्रकरणी नियुक्त तीन सदस्यीय समिती तसेच जिल्हाधिकारी यांनी दाखल केलेल्या ...
जळगाव : भुसावळ येथील मालती नेहते या वृद्ध महिलेच्या मृत्यूप्रकरणी नियुक्त तीन सदस्यीय समिती तसेच जिल्हाधिकारी यांनी दाखल केलेल्या चौकशी अहवालानुसार आढळून आलेल्या दोषींवर राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी निर्णयात दिल्या.
मालती नेहते या वृद्ध महिलेच्या मृत्यूप्रकरणी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, कमला बिऱ्हाडे (रा. अमळनेर) आणि रफीक तडवी (रा. उटखेडा, ता. रावेर) यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती श्रीकांत कुळकर्णी व न्या. एस. व्ही. गंगापूरवाला यांनी निर्णय दिला. यात रुग्णालयाचा निष्काळजीपणा विचारात घेऊन नेहते यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांना दोषींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही निर्णयात दिल्या आहेत. तसेच यापूर्वीच जनस्वास्थ्य अभियान व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन याबाबतीत १२ जून २०२० रोजी दिलेला निकाल आणि सिटीजन फॉर्म फॉर इक्वालिटी विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये १ जून २०२० रोजी दिलेली ऑर्डर व १८ ऑगस्ट २०२० रोजी सूमोटो क्रिमिनल पीआय एल क्र. १/२०२० (रजिस्ट्रार ज्यूडीसीयल मुंबई उच्च न्यायालय अधिकार क्षेत्रातील औरंगाबाद खंडपीठ विरुद्ध भारत सरकार) ही केस, यात देण्यात आलेल्या सर्व निर्देशांचे राज्य सरकारने पालन केले जावे, जेणेकरून याचिकाकर्त्यांनी मागणी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होईल, असेही निर्णयात म्हटले आहे.
आयसीएमआरच्या गाइडलाइनप्रमाणे काम करावे
मालती नेहते यांच्या मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्यानंतर विविध मुद्द्यांवर याचिकाकर्ते व शासनातर्फे युक्तिवाद करण्यात आले. या खटल्यात नुकसानभरपाई, निष्काळजीपणा त्याचबरोबर तीन सदस्यीय समितीचा अहवाल, आयसीएमआर गाइडलाइनप्रमाणे काम करावे यासह विविध मुद्द्यांवर युक्तिवाद करण्यात आला.