साकेगाव येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सतर्कतेने मुले पळवणारे संशयित फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 03:45 PM2019-08-22T15:45:20+5:302019-08-22T15:48:34+5:30
साकेगाव येथे जि.प.केंद्र शाळेजवळ दोन अनोळखी इसम चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलांना बोलवत असताना मुलाने सतर्कतेने नकार देत आरडाओरड केल्याने मुले पकडणारे संशयित फरार झाले.
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे जि.प.केंद्र शाळेजवळ दोन अनोळखी इसम चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलांना बोलवत असताना मुलाने सतर्कतेने नकार देत आरडाओरड केल्याने मुले पकडणारे संशयित फरार झाले. बुधवारी हा प्रकार घडला.
जि.प.उर्दू शाळेतील विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेच्या वेळेवर शाळेच्या प्रांगणावर अर्ध्या तासापूर्वी खेळत होते. त्याच वेळेस दोन अनोळखी व्यक्ती तुटलेल्या इमारती मागे लपून बसले. त्या व्यक्ती इयत्ता चौथीतील विद्यार्थी जीशान अशफाक देशमुख यास चॉकलेटचे आमिष दाखवून बोलवत होत्या. जीशान हा थोडा जवळ गेल्यावर त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमधून काढून औषधी सारखे पावडर काढून ते चॉकलेटवर टाकले. त्याच वेळेस जीशान पुढे न जाता, मागे वळू लागला. हे बघून अनोळखी इसमांनी ओरडून परत त्याला बोलावले. मागे वळून पाहिले तर जीशान परत जात असतानाचा राग घेऊन त्यास दमदाटी करत होते. जीशानसोबत हिना देशमुख, आयशा पटेल, मुस्कान पटेल हे विद्यार्थीदेखील खेळत होते.
हा प्रकार काही क्षणातच पालकांना समजला व शाळेत पालक क्षणार्धात धावत आले. मुले पकडणाऱ्यांनी आपल्या मुलास नेले तर नाही ना, या भीतीपोटी क्षणार्धात शाळेजवळ मोठी गर्दी जमा झाली. मुलांनी ओरड केल्यानंतर संशयित फरार झाले.
शाळेत पालकांचा गोंधळ
मुलांना पकडणारी गँंग फिरत असल्याची व विकत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत असताना त्यातच साकेगावमध्ये दोन अनोळखी इसम चॉकलेटच्या बहाण्याने मुलांना बोलवत असल्याची वार्ता गावामध्ये समजली. परिणामी साकेगावातील इंदिरा गांधी शाळा, जि.प. मराठी व उर्दू शाळा या ठिकाणी पालक पोहोचले व आपल्या मुलांबद्दल शहानिशा केली.
शाळा महामार्गाला लागून असल्यामुळे मुले पकडणारे लगेच फरार झाले.
जीशान देशमुख हा उर्दू शाळेतील चौथीचा विद्यार्थी असून, शाळा पाऊणेअकराला भरते. या शाळेत दोन शिक्षक असून, मुख्याध्यापक शेख आरिफ हे भुसावळवरून ये-जा करतात, तर शिक्षिका शेहनाज बानो जळगाववरून शाळेत येतात.
घटना घडली त्या वेळेस औषधीच्या कामानिमित्त मुख्याध्यापक शेख आरिफ हे वराडसीम येथे औषधी आणण्यासाठी गेले होते, तर ४१ विद्यार्थ्यांसाठी फक्त शिक्षिका शेहनाज बानो ह्या एकट्या शाळेत होत्या.
दरम्यान, या घटनेची दिवसभर गावात चर्चा होती. याबाबत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यात आलेली नाही.