जळगावात रिक्षातून उतरताच आईच्या डोळ््यादेखत मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:16 PM2019-08-08T13:16:21+5:302019-08-08T13:16:49+5:30
स्वखर्चाने शववाहिका आणून मृतदेह केला रवाना
जळगाव : मुंबई येथून उपचार करुन घरी येत असताना नवीन बसस्थानकाजवळ रिक्षातून उतरताच मुलाला भोवळ आली आणि काही क्षणातच त्याने प्राण सोडला. भररस्त्यावर गोंधळात पडलेल्या वृध्द आईची स्थिती पाहता तेथे चहा घेत असलेल्या पोलिसांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी या मुलाला मृत घोषीत केले. युवराज पांडुरंग कुमावत (४९, रा.चुंचाळे, ता.चोपडा) असे या मयताचे नाव आहे.
युवराज यांची आई कस्तुराबाई कुमावत यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, युवराज यांची दाढ काढली असता तेथे सेप्टीक झाले. जळगावला उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मुंबईत जाण्याचा सल्ला दिला. ११ महिन्यापासून ते मुंबईत जावून उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वी युवराज व आई कस्तुराबाई मुंबईला गेले. उपचार झाल्यानंतर तेथून बुधवारी सकाळी रेल्वेने जळगावात आले. तेथून चुंचाळे जाण्यासाठी ते रिक्षाने बसस्थानकात आले. बाहेर रिक्षातून उतरत असतानाच युवराज यांना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. रिक्षा चालक तेथून निघून गेला. अचानक झालेल्या या प्रकाराने वृध्द आई कस्तुराबाई या प्रचंड घाबरल्या. रस्त्यावरच त्यांनी आक्रोश सुरु केला. बाहेर चहा घेत असलेले पोलीस अधीक्षकांचे वाचक तथा सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, त्यांच्या कार्यालयातील प्रवीण पाटील, जमील खान, रवींद्र पाटील, आसिफ पिंजारी व भूषण मांडोळे यांनी वृध्देजवळ धाव घेत तत्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात हलविले. इतकेच नाही तर ते स्वत: रुग्णालयातही गेले.
माणुसकी हीच ओळख
कस्तुराबाई यांचा पुणे व व्यारा (गुजरात) येथे असलेल्या दोन्ही मुलांशी पोलिसांनी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे संदीप पाटील यांनी कळवण येथील जावयाशी संपर्क साधून युवराज यांच्या मृत्यूची माहिती दिली. वृध्देसोबत कोणीही नातेवाईक नव्हते. त्याशिवाय शहरातही कोणीच नातेवाईक नसल्याने या पोलिसांनीच स्व:खर्चाने शववाहिका करुन देत मृतदेह चुंचाळे या मुळगावी रवाना केला.