पायावरील शस्त्रक्रियेनंतर बालक शुद्धीवर आलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:27 AM2019-02-25T11:27:28+5:302019-02-25T11:29:11+5:30
उपचारात हलगर्जीमुळे मृत्यू
जळगाव : दीड वर्षाच्या बालकावर उपचार करताना निष्काळजीपणा केल्याचे सिध्द झाल्याने चिरायु हॉस्पिटलच्या ८ डॉक्टरांविरुध्द शनिवारी मध्यरात्री जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात ३०४ अ प्रमाणे (मृत्यूस जबाबदार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे येथील शासकीय हिरे महाविद्यालयाच्या चौकशी समितीच्या अहवालावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. या अहवालात डॉक्टरांवर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांमध्ये डॉ.राजेश श्रीकृष्ण शिंपी, डॉ. गिरीश इच्छाराम गाजरे, भूलतज्ज्ञ डॉ. एच. आर. बºहाटे, डॉ.अमित नारखेडे, डॉ.संजीव चौधरी, डॉ. अविनाश भोसले, डॉ. वृषाली सरोदे व डॉ.सारिका सुरवाडे यांचा समावेश आहे.
दर आठ तासांनी डॉक्टर बदलले
चिरायु हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर दर आठ तासांनी तन्मयवर उपचार करणारे डॉक्टर बदलत होते. डॉ. संजीव चौधरी, डॉ. अविनाश भोसले, डॉ.वृषाली सरोदे, डॉ.सारिका सुरवाडे यांच्यासह इतर डॉक्टर उपचार करीत होते. त्यावेळी देखील तन्मयची प्रकृती वारंवार बिघडत होती.
शासकीय समितीने ठेवला ठपका
तन्मयचा मृत्यू झाल्यानंतर तो नेमका कशामुळे झाला, त्याला कोण जबाबदार आहे यासाठी गोपाळ भवरे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार अंत्यविधी केल्यानंतर पोलिसांनी उपचाराचे कागदपत्रे, शवविच्छेदन अहवाल, व्हिसेरा अहवाल धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय व प्रयोगशाळाकडे पाठविले होते. त्यानंतर व्हिसेरा व उपचाराच्या कागदपत्रांचा अभ्यास करुन समितीने तन्मय याच्या मृत्यूस बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश श्रीकृष्ण शिंपी, सर्जन डॉ.गिरीश इच्छाराम गाजरे, भूलतज्ज्ञ डॉ. एच.आर.बºहाटे, चिरायु हॉस्पिटल येथे उपचार करणारे डॉ. अमित नारखेडे, डॉ.संजीव चौधरी, डॉ.अविनाश भोसले, डॉ.वृषाली सरोदे व डॉ.सारिका सुरवाडे हे जबाबदार असून त्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. या अहवालाच्या आधारावर तन्मयची आई सोनाली गोपाळ भवरे (वय २९, रा.रामेश्वर कॉलनी) यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक संदीप आराक करीत आहेत.
शासकीय डॉक्टरांच्या समितीने ठेवला ठपका
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील रहिवाशी गोपाळ रामकृष्ण भवरे व पत्नी सोनाली यांचा मुलगा तन्मय (वय १७ महिने) याला ताप येत असल्याने २७ डिसेंबर २०१५ रोजी वर्धमान नगरातील डॉ.राजेश शिंपी यांच्या अमेय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. तेथे डॉक्टरांनी गोळ्या, औषधी दिल्यानंतर मुलाला लगेच घरी नेण्यात आले होते.
दोन - तीन दिवसांनी पुन्हा त्याला ताप आल्याने त्याला पुन्हा डॉ.शिंपी यांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा डॉक्टरांनी रक्त तपासणी करण्याचे सांगितले. त्यानुसार रक्ताची तपासणी केली असता त्यात टायफाईड असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार डॉक्टरांनी औषधी लिहून दिली. त्याने प्रकृतीत सुधारणा झाली. परंतु ताप कमी होत नव्हता.
त्यामुळे पुन्हा तन्मय याला ३१ डिसेंबर २०१५ रोजी डॉ.शिंपी यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी तेथील नर्सला सांगून बाळाला इंजेक्शन देण्याची सूचना केली. या इंजेक्शनमुळे तन्मयला सूज आली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा तन्मयला दवाखान्यात नेण्यात आले. इंजेक्शनमुळे पायाला सूज आली आहे व तापही उतरत नाही असे डॉक्टरला सांगितले असता डॉ.शिंपी यांनी तन्मयला दाखल करुन घेतले. इंजेक्शनच्या ठिकाणी बर्फाने शेकण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
शस्त्रक्रियेनंतर तन्मय कायमचाच झोपला... डॉक्टरांच्या सल्लयानुसार तन्मयच्या पायाची सोनोग्राफी केली. त्यानंतर ४ जानेवारी रोजी डॉ.गिरीश गाजरे यांनी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केली. त्यावेळी त्यांच्यासोबत भूलतज्ज्ञ डॉ. एच.आर.बºहाटे व इतर डॉक्टर होते. शस्त्रकियेनंतर तो ४ ते ५ तासांनी शुध्दीवर येईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते, मात्र तो शुध्दीवर आला नाही, त्यामुळे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी कृत्रिम श्वासोश्वास द्यावा लागेल, असे सांगितले. परंतु तरीही तन्मय शुध्दीवर येत नसल्याने आई, वडीलांची चिंता वाढली. त्यानंी परत डॉक्टरला विनवण्या केल्या. दवाखान्यात संपूर्ण बील वसूल केल्यानंतर ९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता तन्मय मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.