‘त्या’ युवतीचा बालविवाहच; पतीसह १३ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:17 AM2021-07-26T04:17:07+5:302021-07-26T04:17:07+5:30
जळगाव : लग्नाच्या दहाव्या दिवशीच करिना सागर निकम तरुणीने आत्महत्या केल्याची घटना १४ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास दूध ...
जळगाव : लग्नाच्या दहाव्या दिवशीच करिना सागर निकम तरुणीने आत्महत्या केल्याची घटना १४ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास दूध फेडरेशन परिसरातील दांडेकर नगरात घडली होती. दरम्यान, करिना ही १५ वर्षांची असल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे अल्पवयीन असतानाही तिचा विवाह केला व तिला सांसारिक जबाबदारी पार पाडण्यास भाग पाडले, अशा आशयाची तक्रार मुलीच्या आईने दिल्यानंतर नवरदेवासह सासरचे व इतर अशा एकूण १३ जणांविरोधात शनिवारी रात्री शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवदेवासह चार जणांना अटक केली असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
अशी घडली होती घटना
करिना ही यावल तालुक्यातील न्हावी येथे तिची आजी गंगाबाई भालेराव यांच्याकडे शिकायला होती. ती दहावीला शिक्षण घेत होती़ आजीच्या सहमतीने करिना हिचा ११ जुलै २०२१ रोजी जळगाव शहरातील दांडेकर नगर येथील सागर राजू निकम या तरुणाशी विवाह पार पडला होता. लग्नाच्या दहाव्या दिवशी २१ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सासरी दांडेकर नगरात करिना हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर करिनाची आई सुलोचना समाधान भालेराव (रा. खिरोदा, ता. रावेर) यांनी जिल्हा रुग्णालय गाठून आक्रोश केला होता. तसेच करिनाची जन्मतारीख २००५ असून ती १५ वर्षाची अल्पवयीन असतानाही तिचा विवाह केल्याचा आरोप केला होता.
१३ जणांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, शहर पोलिसांनी केलेल्या तपासात करिना हिचे कागदोपत्रानुसार खरे वय हे १५ वर्षे असल्याचे निष्पन्न झाले होते. अल्पवयीन असतानाही करीनाचा विवाह केला. तसेच कमी वयाची असतानाही तिला सांसारिक जबाबदारी पार पाडण्यास भाग पाडले, संसाराची जबाबदारी पेलली न गेल्याने करिनाने आत्महत्या केली. अशी तक्रार करिनाची आई सुलोचना भालेराव यांनी शनिवारी दिली. या तक्रारीवरून करीनाची आजी गंगाबाई भालेराव, लीलाधर सोमा तायडे, संजू लीलाधार तायडे, सुशीलाबाई लीलाधर तायडे (सर्व रा.न्हावी ता. यावल), नवरदेव सागर राजू निकम, सासरे राजू सुकदेव निकम, सासू माया सुनील निकम, सुनील सुकदेव निकम, निर्मला राजू निकम, नागेश राजू निकम (सर्व रा. दांडेकर नगर), राखी संजू तायडे (रा. न्हावी, ता. यावल), सुरेखा भीमराव सोनवणे (रा. गिरडगा, ता. यावल), छाया सुभाष इंगळे (रा. शिरसाठ, ता. यावल) या १३ जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे हे करीत आहेत.
नवरदेवासह चौघांना अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे यांनी शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मयत करिना हिचे पती सागर निकम, सासरे राजू निकम, दीर नागेश निकम व सुनील निकम या चार जणांना अटक केली़ त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़