घरात मुले कंटाळली...'कोरोना सुरक्षित शाळा' सुरू व्हावी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:18 AM2021-09-11T04:18:04+5:302021-09-11T04:18:04+5:30
सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील प्राथमिक शाळा अद्याप सुरू झालेल्या नाही. यामुळे तब्बल १७ ...
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील प्राथमिक शाळा अद्याप सुरू झालेल्या नाही. यामुळे तब्बल १७ महिन्यांपासून मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. परंतु, आता अनेक जण घरात कंटाळले असून, त्यांना शाळा हवी आहे. परंतु, अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे या शाळा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे 'कोरोना सुरशिक्षत शाळा' सुरू करण्यास शासनाने प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता शाळांकडून होऊ लागली आहे़
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नसल्यामुळे ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार १५ जुलैपासून जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या वर्गांची दारे विद्यार्थ्यांसाठी उघडली. त्यानंतर शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भातही शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या़ मात्र, त्यानंतर पुढे शाळा सुरू करण्यासंदर्भात कुठलीही हालचाल झाली नाही.
४५६ शाळांची वाजली घंटा
गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमधील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ७०८ शाळांपैकी सद्य:स्थितीला ४५६ शाळा उघडल्या आहेत. तर ५७०५ शिक्षक, कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असून शेकडो शिक्षकांनी अद्यापही लसीकरण करून घेतलेले नाही. त्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?
शाळांना वेतनोत्तर अनुदान मिळत नाही. कोरोनाच्या सद्य:स्थितीत शाळांमधील वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. पण, त्यासाठी निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे सॅनिटायझेशनचे पैसे देणार कोण? असा प्रश्न शाळा व्यवस्थापनांसमोर निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १७ महिन्यांपासून शाळा बंद आहेत़ कोरोना आता किती दिवस राहील सांगता येत नाही. पण, कोरोना सुरक्षित शाळा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळा सुरू करता येतील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण नियम सुध्दा पाळले गेले पाहिजे. त्यातच मर्यादित संख्येचा विचार करून शासनाने शाळा नियमित सुरू करावी.
- ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापक, विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल
००००००००००
आता मुले घरी कंटाळली आहेत. दुसरीकडे पाल्य अभ्यास करीत नाहीत, अशी ओरड पालकांकडून होत आहे. त्यामुळे कोरोनापासून विद्यार्थी सुरक्षित राहतील, यासाठी संपूर्ण सुविधा शाळेत ठेवून वर्ग उघडली जाऊ शकतात. नियमित सॅनिटायझेशन करता येईल व एक दिवसाआड शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाईल. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दोन ते तीन सत्रांमध्ये शाळा भरविता येतील.
- ज्योती गोसावी, मुख्याध्यापिका, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय
एकूण विद्यार्थी
पहिली : ७६५१४
दुसरी : ७९३१३
तिसरी : ७७९१८
चौथी : ८००५०
पाचवी : ७८८२८
सहावी : ७७३११
सातवी : ७७६७७
आठवी : ७६३८५
नववी : ७६३५८
दहावी : ५८३१७
अकरावी : ४५८९४
बारावी : ४९४०३