मैदानासाठी बालकांची थेट प्रांत कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 05:57 PM2020-11-06T17:57:29+5:302020-11-06T17:57:37+5:30
पालिका प्रशासन मैदानाकडे मुळीच लक्ष देत नाही मैदानावर वयोवृद्ध व्यक्ती व खेळाडूंना घाणीचा, सांडपाण्याचा प्रचंड सामना करावा लागतो.
भुसावळ : शहरातील एकमेव हक्काचे मैदान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या दुकानाला परवानगी देऊ नका, मैदानावरील भाज्यांची दुकाने त्वरित हलवा, मैदानाची साफसफाई करा अन्यथा प्रांत कार्यालयातच बॅट बॉल खेळून आंदोलन करू असा इशारा चिमुकल्यानी दिला.
जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणार्या शहरात खेळाडूंसाठी चांगले मैदान नाही हे मोठे दुर्दैव असून उपलब्ध असलेल्या ओबड-धोबड अशा डॉ. आंबेडकर मैदानावर खेळाडू कसातरी सराव करतात.
पालिका प्रशासन मैदानाकडे मुळीच लक्ष देत नाही मैदानावर वयोवृद्ध व्यक्ती व खेळाडूंना घाणीचा, सांडपाण्याचा प्रचंड सामना करावा लागतो.
दरवर्षी काही ना काही निमित्ताने व्यवसायिक वापरासाठी मैदानचा वापर करण्यात येतो. यामुळे उपलब्ध असलेल्या मैदानाची परिस्थिती अजूनही बिकट होत आहे, शिवाय पालिका प्रशासनाकडून अमृत योजनेच्या कामाचा सर्व गाळ मैदानावर आणून टाकून दिलेला आहे. मैदाना मागील भागातून मेन रोड असलेल्या पाईपलाईन मधून सतत पाण्याचा अपव्यय होतो. यामुळे डेंगू सारखे आजार होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरुपात भाजीपाला विक्रेत्यांना मैदानावर दुकाने थाटण्याची मुभा दिली होती, मात्र यानंतरही भाजीपाला व्यवसायिक मैदानावर दुकान थाटत आहे. यामुळे मैदानावर सर्वत्र भाजीपाल्याचा कचरा होतो तसेच रात्रीच्या वेळेस मैदानात दिवे नसल्यामुळे सर्वत्र काळोख असतो. याचा गैरफायदा घेत याठिकाणी दारूच्या पार्ट्या होतात. यातूनच गुन्हेगारी वृत्ती निर्माण होत आहे. फोडलेल्या बाटल्या मुळे खेळाडूंना खेळताना काही वेळेस इजा पोहोचते. हे पाहता मैदानाची त्वरित साफसफाई करावी मैदानाचा कुठलाही व्यवसायिक वापर टाळावा, असा निवेदनात दिलेला आहे.
निवेद देताना चिमुकले हे बॅटबॉलसह संबंधित पोशाखातच प्रांत कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी ते गेले होते .