बालकांना बसावे लागते कुडाच्या छताखाली : चहार्डी येथील अंगणवाडीची दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 09:19 PM2019-09-21T21:19:05+5:302019-09-21T21:20:17+5:30
भिंतीच नाहीत, चार्ट लावायचे कुठे ? येथील अंगणवाडीत ० ते ६ वर्षे वयोगटातील एकूण बालके (लाभार्थी) ८६ आहेत. येथे शासनाकडून मिळणारे शैक्षणिक साहित्य ठेवायला जागा नसते. भिंतीच नसल्याने बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी कार्यालयाकडून जे चार्ट, पोस्टर मिळतात ते लावता येत नाही.
चोपडा : चहार्डी येथील प्लॉट वस्तीज भागात गेल्या अनेक वर्षांपासून मिनी अंगणवाडी सुरू आहे. मात्र इमारत नसल्याने अंगणवाडी उघड्यावर भरत असते. गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस सुरू असल्याने शेळ्या आणि गुरे बांधले जाणाऱ्या कुडाच्या छताखाली भरते आहे.
सविस्तर असे की, सध्या महाराष्ट्रभर अंगणवाडीमार्फत अनेक लाभाच्या योजना राबविल्या जातात. मात्र चहार्डी येथे वेले रस्त्याकडे असलेल्या प्लॉट वस्ती भागात मिनी अंगणवाडी भरते.
या भागात सर्व आदिवासी समाजातील लोकांचे वास्तव्य आहे. म्हणून या मिनी अंगणवाडीत येणाºया लहान चिमुकल्यांना बसण्यासाठी स्वतंत्र इमारत अजूनही बांधलेली नाही. त्यामुळे या मिनी अंगणवाडीतील बालकांच्या नशिबी आतापासूनच दुर्दशा आणि संघर्षाला सामोरे जाण्याचे दिवस आले आहेत. कधी झाडाच्या सावलीत, कधी कुडाच्या झोपडीत तर कधी कुडाच्या छताखाली ही बालके बसवली जातात. तिथेच त्यांना आहार दिला जातो.
या अंगणवाडीसाठी मनीषा ढोले (भोई) या सेविका म्हणून काम करतात. त्यांच्यासह या वस्ती भागातील आदिवासी ग्रामस्थांनी नवीन इमारत बांधून मिळण्याची मागणी केली आहे. वारंवार मागणी करूनही पंचायत समितीकडून दुर्लक्ष केले जात आहे. एकात्मिक प्रकल्प विभागाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
शासनाकडून मिनी अंगणवाडीसाठी इमारत बांधकाम करण्याची तरतूद नसते. परंतु अंगणवाडी कोणतीही असली तरी तिथे लाभार्थी असतातच. म्हणून मिनी अंगणवाडीसाठी नवीन इमारत व्हावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भाडे तत्त्वावरही इमारत घेता येते. मी आजच प्रभार घेतला आहे. चहार्डी येथील इमारत बांधकामासाठी निश्चित प्रयत्न केले जातील.
-संजय रतन धनगर, प्रभारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, चोपडा