बालपणी मातेविणा आबाळ झालेल्या विवाहितेच्या मुलांनाही क्रूर नियतीने केले मातेविणा आबाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 06:46 PM2019-12-29T18:46:04+5:302019-12-29T18:52:20+5:30
मातेचा प्रसूती दरम्यानच अकाली मृत्यू झाल्याने बालपणी मातेविणा आबाळ झालेल्या ४२ वर्षीय विवाहितेचा गतिरोधकावरून मोटारसायकल उधळून पडल्याने करूण अंत झाल्याने, तिच्या मुला-मुलींचाही कोवळा संसार उघड्यावर पाडून क्रूर नियतीने त्यांनाही मातेविणा आबाळ केल्याची हृदयद्रावक घटना घडली.
किरण चौधरी
रावेर : तालुक्यातील खानापूर येथील माहेरवाशीण असलेल्या मातेचा प्रसूती दरम्यानच अकाली मृत्यू झाल्याने बालपणी मातेविणा आबाळ झालेल्या ४२ वर्षीय विवाहितेचा गतिरोधकावरून मोटारसायकल उधळून पडल्याने करूण अंत झाल्याने, तिच्या मुला-मुलींचाही कोवळा संसार उघड्यावर पाडून क्रूर नियतीने त्यांनाही मातेविणा आबाळ केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने खानापूर व विरोदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खानापूर येथील राजाराम जीवराम चौधरी यांची थोरली कन्या देवकाबाई लक्ष्मण महाजन हिचा प्रसूतीदरम्यान माहेरीच करूण अंत झाला होता. त्यावेळी सुनंदा (वय ७), अक्का (वय ४) व एकनाथ यांच्या जन्मत: मातृछत्र हरपून तीनही मुलेही मातेविणा आबाळ झाली होती. त्यांचा बालपणीचा सांभाळ आजोबा राजाराम जीवराम चौधरी व आजी केसरबाई राजाराम चौधरी यांनी मायेची ऊब देत त्यांना लहाणपणीच शहाणं केलं. त्यांना समज आल्यानंतर सुनंदा व एकनाथ यांचे वडिलांकडे पालन पोषण झाले तर लहान अक्का ही मामाकडेच शहाणी झाली. सुनंदा ही सुजाण झाल्यानंतर तिचा विवाह विरोदा येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास महाजन (लभाणे) यांच्याशी झाला. दुसरी अक्का हिला विवाहानंतरच वैधव्य आले, तर लहान एकनाथ हा वैद्यकीय शिक्षण घेऊन बºहाणपूर तालुक्यातील भावसा हे वैद्यकीय सेवा बजावू लागला.
बहिण सुनंदा हिच्या घरी नांदा सौख्य भरू लागल्याने वैधव्य आलेली बहिण अक्का व भाऊ डॉ.एकनाथ यांच्याकरीता ती आश्रयस्थान ठरली. तिची थोरली सुकन्या अंजली हिचा रावेर येथील सरदार जी.जी.हायस्कूलमधील शिक्षक यांच्याशी गतवर्षीच विवाह झाला. दुसरी मुलगी तेजस्विनी ही अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत आहे, तर कोवळा मुलगा प्रतीक हा इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे.
आज घरी सुख नांदत असताना सुनंदाबाई हिच्या संसाराला काळाची जणू काही दृष्ट लागली. तिच्या सावत्र बहिणीची लहान मुलगी दगावल्याने कैलास महाजन व सुनंदाबाई दोघेही मोटारसायकलने अंत्यसंस्काराकरीता संग्रामपूर (म.प्र.) येथे जात होते. तेव्हा दर्यापूर-बºहाणपूर-अमरावती महामार्गावरील गतिरोधकावरून मोटारसायकल उधळली. त्यात सुनंदाबाई ही मोटारसायकलवरून मागच्या मागे रस्त्यावर कोसळून डोक्यावर पडल्याने तिच्या मेंदूस गंभीर दुखापत झाली. तिला तत्काळ बºहाणपूर शासकीय रुग्णालयात व तेथून अति तातडीने जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मेंदूरोगतज्ज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मेंदूची शस्त्रक्रिया केली. मात्र, तिच्या मेंदूतील रक्तस्त्राव थांबवण्यात अपयश आल्याने तिची प्राणज्योत मालवली. रविवारी मध्य प्रदेश सीमेवरील फुलाचे विरोदा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
क्रूर नियतीने सुनंदाबाई हिचे बालपणीच मातेविणा आबाळ केले असताना पुन्हा तिची मुलगी अंजली, तेजस्विनी व प्रतीक यांनाही मातेविणा आबाळ केल्याची हृदय पिळवटून टाकणाऱ्या स्मृतींनी आज धाय मोकलून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.