बाल साहित्य हे आयुष्य घडविण्याचे ‘साधन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:44 PM2019-11-18T22:44:48+5:302019-11-18T22:45:24+5:30
जळगाव : आजची मुले ही खूप प्रगल्भ आहेत. लहान पणापासूनच त्यांना सर्व काही समजायला लागते. मोबाईलमुळे तर ही मुले ...
जळगाव : आजची मुले ही खूप प्रगल्भ आहेत. लहान पणापासूनच त्यांना सर्व काही समजायला लागते. मोबाईलमुळे तर ही मुले एकाकी होत आहेत. पुढे चालून या बालकांचा यंत्र होऊ द्यायचा नसेल तर त्यांच्या हातात चांगली पुस्तके वाचायला द्या. ही बाल साहित्यांची पुस्तके क्रिया नसून, तर आयुष्य घडविण्याचे खरे साधन आहे. असे मत नामवंत लेखक डॉ. सुरेश सावंत (नांदेड) यांनी रविवारी मांडले.
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगावतर्फे रविवारी भास्कर मार्केट जवळील अखिल भारतीय जैन संघटनेच्या सभागृहात एक दिवसीय सुर्योदय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सावंत हे बोलत होते.
तत्पूर्वी सकाळी संमेलनाचे उद्घाटन जळगावातील बाल साहित्यिक गिरीश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. व्यासपीठावर कवयित्री माया धुप्पड , संघपती दलुभाऊ जैन, उज्ज्वला टाटीया, सुर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन उपस्थित होते. दरम्यान,यावेळी संमेलनस्थळाला कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृह, व्यासपीठाला साने गुरुजी व्यासपीठ तर प्रवेशद्वाराला बालकवी नगर,धो. वे. जोगी प्रवेशद्वार असे देण्यात आले होते.
यापुढे डॉ. सुरेश सावंत यांनी सांगितले की, कोवळ््या मुलांना संस्कारित करण्यासाठी आतापासूनच संस्कार रुजविणे गरजेचे आहे. ‘शब्द’ लिहायला किंवा वाचायला शिकविणारे शिक्षक आपल्याला खूप सापडतील. पण शब्द जगायला शिकविणारे शिक्षक सापडणे, दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत बाल साहित्यातील ‘शब्दच’ मदतीला धावून येत असल्याचे सांगितले. यावेळी बाल साहित्यिक योगेश पाटील यांनी, सामाजिक विकृतींना आळा घालण्यासाठी साहित्यनिर्मिती करणे, ही आपली जबाबदारी असून, लेखणी नावाचे शस्त्र आपल्याकडे आहे. कारण लेखनीने मने जिंकता येतात, युद्धे नाहीत आणि युद्धाने जग जिंकता येते, माणसे नाहीत. असे सांगत बदलत्या काळानुसार साहित्य प्रवाह कायम टिकून रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात कथाकथन झाले. यामध्ये सुभाषचंद्र वैष्णव (ह.मु. गोवा) व एकनाथ आव्हाड (मुंबई)यांनी सहभाग घेतला. तिसºया सत्रात शब्द झंकार या कविसंमेलनात डॉ. अशोक कोळी यांच्यासह विविध कविंनी कविता सादर केल्या.
मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण
संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत यांच्याहस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सूर्योदय बालमित्र पुरस्कार सुभाषचंद्र वैष्णव व एकनाथ आव्हाड यांना देण्यात आला. तर सुर्योदय बालनाट्य पुरस्कार मुंबई येथील ज्योती कपिले यांच्या ‘कोडी झाली नाटुकली’ या बालनाट्य लेखास देण्यात आला. तसेच सुर्योदय बालकाव्य पुरस्कार औरंगाबाद येथील गणेश घुले यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या बालकाव्य संग्रहास देण्यात आला. सूत्रसंचालन वैदेही नाखरे तर आभार सतिश जैन यांनी मानले.