सततच्या लॉकडाऊनने वाढवले मुलांचे वजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:16 AM2021-03-25T04:16:13+5:302021-03-25T04:16:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्याने व वाढत्या कोरोनामुळे मुले जवळपास घरातच असून, मोबाईल आणि ...

Children's weight increased due to continuous lockdown! | सततच्या लॉकडाऊनने वाढवले मुलांचे वजन !

सततच्या लॉकडाऊनने वाढवले मुलांचे वजन !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्याने व वाढत्या कोरोनामुळे मुले जवळपास घरातच असून, मोबाईल आणि टीव्हीवरच त्यांचा दिवस जात आहे. परिणामी मुलांचे वजन वाढण्याचे प्रमाण वाढण्यासह त्यांची जीवनशैलीदेखील बदलत आहे. यामुळे मुलांची शारीरिक हालचाल आवश्यक असून, त्यांच्या खाण्या-पिण्यावरही पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्ला बालतज्ज्ञ डॉक्टर व आहार तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढून लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण झाले. या काळात शाळा बंद असल्याने लहान मुले घरातच आहेत. त्यात मध्यंतरी शाळा सुरू झाल्या तरी संसर्ग वाढल्याने त्या पुन्हा बंद झाल्या. लॉकडाऊन तसेच इतर निर्बंधांमुळे शाळा, उद्याने, मैदाने बंद असल्याने मुले घराच्या बाहेर पडणे बंद झाले आहे. मुले घरातच असल्याने त्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे.

लॉकडाऊन काळात मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुलांना घराबाहेर पाठवणे कठीण झाल्याने पालक हा धोकाही पत्करत नाहीत. त्यामुळे बैठ्या उपक्रमांचे परिवर्तन ‘स्क्रीन टाईम’ वाढण्यात झाले. टी. व्ही. किंवा मोबाईलसमोर जेवण केल्याने त्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. या काळात बैठ्या जीवनशैलीत वाढ होत असल्याने शरिरात अतिरिक्त कॅलरीज् वाढत जाऊन स्थुलता वाढीस लागते. त्यामुळे मुलांचे वजन वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुलांनी हे करावे

लॉकडाऊनमध्ये मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने त्यांच्या जीवनशैलीचे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी पॅकेज फूडचे प्रमाण कमी करत जेवणात पुरेसा आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, शारीरिक हालचालीसाठी विविध खेळ खेळावे, झोप पुरेशी घ्यावी. स्क्रीन टाईम कमी करत पुस्तके-व्यायाम यासारख्या उपक्रमांमध्ये गुंतवून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे नियोजन पालकांनी केले पाहिजे, असा सल्ला आहारतज्ज्ञ निनाद चौधरी यांनी दिला.

मुलांनी हे टाळावे

मोबाईल, टी. व्ही. पाहताना जेवण करू नये, मुले घरातच राहात असल्याने त्यांनी स्क्रीनसमोर जास्त राहू नये व रात्री जागरण करू नये, ज्या प्रकारचे अन्न खाण्याची सवय मुलांना लागते, ती सवय नंतर बदलणे कठीण होऊन बसते आणि मुलांना या सवयींचा भविष्यात त्रास होतो. त्यामुळे नियमितपणे गोड पदार्थ, पॅकेज फूड खायची सवय मुलांना लावू नये, असाही सल्ला दिला जात आहे.

या कारणांमुळे वाढतेय मुलांचे वजन

लॉकडाऊनच्या काळात मुले घराबाहेर न पडल्याने संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी झाले, हा एक फायदा याकाळात झाला आहे. मात्र, शारीरिक व्यायाम बंद झाला व घरी केवळ खाणेच सुरू असल्याने कधी नव्हे एवढे वजन मुलांचे वाढले आहे. मुलांचे बाहेर पडणे बंद झाल्याने ते सतत स्क्रीनसमोर राहात आहेत. या बैठ्या सवयीमुळेही मुलांच्या वजन वाढीला मदत होत आहे.

- डॉ. विश्वेश अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ

शाळा बंद त्यामुळे अभ्यासही ऑनलाईन होण्यासह मुले इंटरनेट व टी. व्ही.कडे अधिक वळली आहेत. दिवसभर ती बसून राहात असल्याने त्यांचे वजन वाढले आहे. मैदान, शाळा बंद असल्याने हालचालीही होत नसल्याने त्याचा परिणाम होत आहे. मुलांना मोबाईल दाखवून जेवू घालणे चुकीचे असून, त्यामुळे मुले चिडखोर, विक्षिप्त होतात. त्यामुळे असे प्रकार टाळले पाहिजे.

- डॉ. राजेश पाटील, बालरोग तज्ज्ञ.

लाॅकडाऊनच्या काळात मुले घराबाहेर पडतच नसल्याने बसून-बसून त्यांचे वजन वाढत आहे. घरातच असल्याने खाणे व मोबाईल, टी. व्ही.मुळे जागरण वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या शरिरावर परिणाम होत आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळावे, शारीरिक हालचाली कराव्यात, सकाळी लवकर उठावे.

- डॉ. हेमंत पाटील, बालरोग तज्ज्ञ.

Web Title: Children's weight increased due to continuous lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.