मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:17+5:302021-03-21T04:16:17+5:30

जळगाव : उन्हाळ्याची चाहूल लागताच लाल तिखट (मिरची), मसाले करण्याची लगबग सुरू झाली असतानाच सर्वच घटक पदार्थांचे भाव वाढले ...

Chilies, spices hit by inflation | मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

Next

जळगाव : उन्हाळ्याची चाहूल लागताच लाल तिखट (मिरची), मसाले करण्याची लगबग सुरू झाली असतानाच सर्वच घटक पदार्थांचे भाव वाढले आहे. एक तर मागणी वाढली त्यात अवकाळी पावसामुळे मसाल्याच्या अनेक पिकांना फटका बसल्याने त्याचा परिणाम होऊन चांगलीच भाववाढ झाली आहे.

जळगावातील खान्देशी मसाला तसा प्रसिद्ध असल्याने येथे नेहमीच मसाल्याला मागणी असते. त्यात उन्हाळ्यात मसाले, लाल तिखट करण्यावर अधिक भरतो. तसेच लग्नसराईमुळेदेखील मसाल्याची मागणी वाढते. त्यानुसार यंदादेखील मसाले तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू असून मसाले विक्रीच्या दुकानांवरही खरेदी वाढली आहे. मागणी पुरवठ्याच्या तत्वानुसार मागणी वाढताच मसाल्याचे भावदेखील वधारले आहेत.

अवकाळी पावसाचा फटका

मसाल्याचे बहुतांश घटक पदार्थ हे दक्षिण भारत व विदेशातून येत असतात. त्यात यंदा अधिक पाऊस व त्यानंतरही अधून-मधून झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. ऐन काढणीच्या वेळी झालेल्या पावसाने मालाच्या दर्जावरही परिणाम झाला असून मालाचा तुटवडाही भासत आहे.

राज्याच्या विविध भागासह दक्षिण भारतातून येते मिरची

दक्षिण भारतासह खान्देशातील नंदुरबार, धुळे तसेच नाशिक, सटाणा, मलकापूर या भागातून लाल मिरचीची आवक असते.

या सोबतच जिल्ह्यातील बोदवड येथून पिवळी मिरची येते. उन्हाळ्यात पापड, बिबड्या यामध्ये टाकण्यासाठी तिला मागणी असते.

यंदा मात्र पावसाचा फटका बसल्याने तिची आवकच नसून मागणी करूनही ती मिळत नसल्याचे चित्र आहे.

आवक नसल्याने सर्वच प्रकारच्या मिरचीचे भाव चांगलेच वधारले आहे.

मिरचीचे दर (प्रती किलो)

चपाटा मिरची - २४० ते २७०

रसगुल्ला मिरची - २३० ते २६०

काश्मिरी - ३५० ते ४००

लवंगी - २६० ते २८०

मसाल्याचे दर (प्रती किलो)

धने- ९० ते १२०

जिरे-१८० ते २३०

तीळ - १४० ते २००

खसखस - १६५० ते १७००

खोबर - १९० ते २३०

मेथी - ७५ ते ११५

हळद - २७५ ते २८०

अन्य मसाले (प्रती किलो)

लवंग - ५०० ते ८५०

बदामफुल - ६००

बडीशेप - ३००

तेजपान - १२० ते १५०

दगडफूल - ४५० ते ७००

वेलदोडे -२६०० ते २७००

गृहिणी म्हणतात

गेल्या काही दिवसांपासून सर्वच वस्तूंचे भाव वाढत असून यामुळे गणित कोलमडत आहे. त्यात आता मसाल्याचेही भाव वाढल्याने वर्षभराचे नियोजन कसे करावे, अशी चिंता आहे. मिरची व इतर पदार्थ तर दररोज लागणारे आहे. त्यामुळे त्यांचे भाव कितीही वाढले तरी घ्यावेच लागते. मात्र यात आर्थिक भार अधिकच वाढच आहे.

- शुभांगी चौधरी, गृहिणी

उन्हाळा लागला म्हणजे मसाले तयार करून ठेवावे लागतात. त्यात आता मसाल्याची तयारी सुरू असताना मोठी भाववाढ झाल्याने खरेदीत काहीसी कपात करावी लागत आहे. मात्र जे आवश्यक आहे, ते तर घ्यावेच लागते. त्यामुळे यंदा महागाईच्या झळा अधिकच वाढल्या आहे.

- जयश्री महाजन, गृहिणी

Web Title: Chilies, spices hit by inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.