चिमणी दिन विशेष; सिलबंद खाद्यसंस्कृतीने हिरावला चिमण्यांचा घास!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 04:53 PM2023-03-19T16:53:28+5:302023-03-19T16:53:59+5:30

जागतिक चिमणी दिवस : संकटांच्या मालिकेतही चिवचिवाट कायम

Chimney Day Special; Sealed food culture destroyed the grass of the sparrows! | चिमणी दिन विशेष; सिलबंद खाद्यसंस्कृतीने हिरावला चिमण्यांचा घास!

चिमणी दिन विशेष; सिलबंद खाद्यसंस्कृतीने हिरावला चिमण्यांचा घास!

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव : ग्रामीण भागात अंगणात धान्य पाखडले जायचे. त्यातून चिमण्यापाखरांसह अनेक पक्षी खाद्य वेचायला दाराशी यायचे. मात्र आता सीलबंद खाद्यसंस्कृतीसह ‘मॉल’मधील धान्याने जणू चिमण्यांचा घासच हिरावला आहे, असेच चित्र सर्वदूर आहे.

चिमण्यांचा सात्विक चिवचिवाट जपण्यासाठी शासनासह अनेक पक्षीप्रेमी संघटनांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.  भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी म्हणून चिमण्यांची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जात आहे.

गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक घट झालेल्या प्रजाती :

१) पांढऱ्या पुठ्ठय़ाचे गिधाड (व्हाईट रम्पड् व्हल्चर)
२) रिचर्डची चिमणी (रिचर्ड्स पिपिट)
३) भारतीय गिधाड (इंडियन व्हल्चर)
४)सोन चिखल्या (पॅसिफिक गोल्डन प्लोवर)
५)  बाकचोच तुतारी (कल्र्यू सॅण्डपायपर)
घट कशामुळे?
१.उद्योगीकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढते प्रदूषण.
२.शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, सिमेंटची घरांमुळे चिमण्यांचा रहिवास धोक्यात आला आहे. आधीच्या काळात कौलारू घरे व त्यासमोर असणाऱ्या विहिरींमुळे चिमण्यांचा मोठ्या प्रमाणावर रहिवास होता. 
३.कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले.
४.पिकांवर हानीकारक रासायनिक खतांची आणि किटकनाशकांची होणाऱ्या फवारणीतून विषबाधा झालेल्या चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
५.विणीच्या हंगामात (प्रजननकाळात) चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास.
संवर्धनाची गरज
पाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे.
पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे.
शेतीसाठी हानीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे.
चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे.
कोट
चिमण्यांच्या आयुष्याचे जतन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. चिमण्यांचा दाराशी आणि अंगणात असणारा रहिवास आरोग्याच्यादृष्टीने नक्कीच ऊर्जादायी आहे. त्यामुळे प्रत्येकाने चिऊतांईसाठी पाणी, अन्न दाराशी उपलब्ध करावे आणि सात्विक चिवचिवाटाचे धनी व्हावे.
-अश्विन लिलाचंद पाटील, संस्थापक अध्यक्ष, उडान पक्षीमित्र संस्था अमळनेर

Web Title: Chimney Day Special; Sealed food culture destroyed the grass of the sparrows!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव