गायी, म्हशी असल्याचे सांगितले अन् शोधले चिमुकलीचे पालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:38 AM2021-01-13T04:38:47+5:302021-01-13T04:38:47+5:30
जळगाव : सम्राट कॉलनीतील गवळीवाड्यातून खेळताना हरविलेली तीन वर्षांची मुलगी थेट महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ जाऊन धडकते. महामार्गावरील वाहनांची ...
जळगाव : सम्राट कॉलनीतील गवळीवाड्यातून खेळताना हरविलेली तीन वर्षांची मुलगी थेट महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ जाऊन धडकते. महामार्गावरील वाहनांची वर्दळ व अपघाताचा धोका लक्षात घेता काही लोकांनी या बालिकेला थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनीही चिमुरडीची अवस्था पाहता तिच्या तोंडून आलेल्या गायी, म्हशी या दोनच शब्दावरून तीन तासात तिच्या पालकांचा शोध घेतला. मुलीला पाहून पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा प्रसंग रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात घडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनीतील गवळीवाड्यातील योगेश मारुती गवळी यांची मुलगी रविवारी दुपारी अडीच वाजता गल्लीत खेळत होती. खेळताना ती चालत जाऊन थेट महामार्गावर जाऊन धडकली. पेट्रोल पंपावर येत असलेल्या लोकांच्या नजरेस ही मुलगी पडली. त्यांनी या मुलीला बोलते करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती काहीच सांगत नव्हती. फक्त रडणे सुरू होते. त्यामुळे या मुलीला नागरिकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. तेथे महिला पोलीस कर्मचारी निलोफर सय्यद यांनी तिला मायेने जवळ घेत आस्थेवाईकपणे गोंजारून चौकशी केली असता आमच्या घरी गाय व म्हशी आहेत, तेथे आमचे घर आहे, इतकेच ती तोतऱ्या व बोबड्या शब्दात ती सांगत होती.
तीन पोलिसांनी पिंजून काढला परिसर
मुलीच्या माहितीवरून कॉन्स्टेबल गोविंदा पाटील, राकेश बच्छाव व अतुल पाटील यांनी मोबाइलमध्ये मुलीचा फोटो घेऊन पोलीस स्टेशन सोडले. सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला तर तिघे पाेलिसांनी ज्या भागात गाई व म्हशी पालन करणारे लोक राहतात, अशा ठिकाणी चौकशी केली. शेवटी तीन तासांनंतर सम्राट कॉलनीत पोहोचल्यावर तेथे काही लोकांना फोटो दाखविला असता ही मुलगी योगेश गवळी यांंची आहे व ती हरविल्याचे समजले. त्यानुसार गवळी पोलीस ठाण्यात आले. मुलीने वडिलांना पाहून त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांनीही तिला कवेत घेतले आणि आपोआपच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. खाकीतील माणुसकी पाहून गवळी भारावून गेले.