माझी वसुंधरा अभियानात राज्यात चिनावल तृतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:26+5:302021-06-06T04:13:26+5:30
चिनावल, ता. रावेर : येथील ग्राम पंचायतीने सन २०२०-२१ अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने पर्यावरण विभाग व वातावरणातील ...
चिनावल, ता. रावेर : येथील ग्राम पंचायतीने सन २०२०-२१ अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने पर्यावरण विभाग व वातावरणातील बदल विभागामार्फत राबविलेल्या ‘माझी वसुंधरा अभियानात’ राज्यातून तृतीय क्रमांक मिळवला आहे. यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
५ जून रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री संजय बनसोडे विभागाच्या आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निकाल जाहीर करून हा पुरस्कार ऑनलाइन देण्यात आला.
या अभियानात जळगाव जिल्ह्यातून चिनावल तालुका रावेर या ग्राम पंचायतीने शासनाने व पर्यावरण विभागाने ठरवून दिलेल्या सर्व त्या निकषांचे पालन करत गाव प्रदूषणमुक्त केले तसेच प्लास्टिकमुक्त गाव, घनकचरा व्यवस्थापन, गांडूळखत प्रकल्प, सोलर ऊर्जास्रोत, ई-लर्निंग शाळा आदींकडे लक्ष पुरविले. कोरोना काळ असूनही ही मोहीम चिनावल ग्राम पंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच भावना योगेश बोरोले, उपसरपंच, ग्राम विकास २९१ ग्राम पंचायतींमधून ही निवड करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातून राज्यात चिनावल सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत व राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आल्याने उपस्थित मंत्र्यांनी सरपंच भावना बोरोले, ग्राम विकास अधिकारी संतोष सपकाळे यांचे ऑनलाइन पद्धतीने अभिनंदन करून पुरस्कार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला चिनावल ग्राम पंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच भावना बोरोले, रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल सर्व सदस्य ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाशी जुळले होते. चिनावल ग्राम पंचायत कार्यालयातून या सोहळ्यात सर्व सहभागी झाले होते. या आधीही ग्रामपंचायतीने वेळोवेळी राबविलेल्या अभियान असो वा पुरस्कार तसेच तंटामुक्ती अभियान असो यात नेहमीच अव्वल नंबर पटकावला आहे. सरपंच भावना बोरोले यांच्या उत्कृष्ट कार्याने त्यांना स्वतः मानवाधिकार संघटनेचा खानदेश रणरागिणी राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कारही मिळाला आहे.
सदर कार्यक्रम हा ऑनलाइन असला तरी चिनावल ग्राम पंचायत कार्यालयात पोलीस पाटील नीलेश नेमाडे, तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सरपंच योगेश बोरोले. ग्राम पंचायत सदस्य सागर भारंबे, कविता किरंगे, धनश्री नेमाडे व सर्व सदस्य हजर होते.