चिन्या जगताप खून प्रकरण; तत्कालीन जेलर पेट्रस गायकवाड निलंबित, गृह विभागाचे आदेश
By सागर दुबे | Published: April 9, 2023 08:08 PM2023-04-09T20:08:25+5:302023-04-09T20:08:31+5:30
११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता.
जळगाव : कच्चा कैदी चिन्या जगताप याचा जळगाव जिल्हा कारागृहात पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना अडीच वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यासह पाच जणांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची राज्य शासनाच्या गृह विभागाचे उपसचिव विनायक चव्हाण यांनी दखल घेऊन चार दिवसांपूर्वी तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे.
११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगधिकारी, कारागृह पोलीस कर्मचारी यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप चिन्या जगताप यांच्या पत्नी मीना जगताप यांनी केले होते. त्यांनी गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते. मात्र, त्यांची दखल घेतली जात नव्हती. अखेर मीना जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नंतर १४ महिन्यांनी गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, आता राज्य शासनाने ६ एप्रिल रोजी आदेश काढून पेट्रस गायकवाड याला निलंबित केले आहे. निलंबन काळात गायकवाड याचे मुख्यालय अहमदनगर कारागृह असेल. पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. रोज सकाळी व दुपारी पेट्रस गायकवाड यांना हजेरी द्यावी लागणार आहे. निलंबन काळात कुठलीही नोकरी व धंदा करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.