निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:20 PM2018-09-15T15:20:35+5:302018-09-15T15:21:10+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘रंग प्रेमाचे’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक डॉ.उल्हास कडूसकर...
राजेश - या या, साधना मॅडम या! तुमचीच वाट बघत होतो.
साधना - अरे, मॅडम काय? अहो जाहो काय? काय तू तरी राजेश? आणि मी अगदी वेळेवर आलेय हं ! बरोबर, ठरलेल्या वेळी.
राजेश - अग, तू काय ती कॉलेजची मुलगी राहिलेली नाहीस, चुलबुली, बडबडी, कुठल्याही ग्रुपमध्ये सहज मिसळणारी, कधी बॅडमिंटनची रॅकेट तर कधी टेबल टेनिसची बॅट हातात घेऊन भिंगरीसारखी फिरणारी.
साधना - तुला कुणी सांगितलं की मी बदलली आहे? मी आहे तशीच आहे हो, आता लग्नानंतर थोडाफार फरक पडणारच.
राजेश - पडला ना? तेच तर मी म्हणतोय ! आता तुम्ही प्रतिष्ठित, सुविद्य सुगृहिणी आहात !
साधना- बरं बरं ते राहू दे !
राजेश - आणि तू एकटीच ! एकटी कशी काय आलीस ?
साधना - हे बघ राजेश, तू मला इथे कशाला बोलावले आहेस आणि काय विचारणार आहेस ते मला माहीत आहे म्हणूनच मी एकटी आली आहे.
राजेश - म्हणजे तू ओळखलंस तर?
साधना - अर्थात.
राजेश- मग, मी तीन महिन्यांसाठी यु.के.ला इंग्लंडला गेलो काय आणि नेमके तेव्हाच तू लग्न करून टाकलंस?
साधना - तू माझा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड अगदी लहानपणापासूनचा मित्र, माझ्या साऱ्या बारीकसारीक गोष्टी तुला माहिती आणि एवढा मोठा निर्णय तू नसताना मी कसा काय घेतला ...?
राजेश - अग तसं नाही ग ! पण इतक्या लांब असताना मला लगेच येणंही शक्य नव्हते.
साधना - आपल्याला डावललं असं तुला वाटत असेल.
राजेश- छे छे ! तसं नाही... तू हुशार आहेस, सूज्ञ आहेस.
साधना - तरी पण मी अनुरागशी लग्न कसं काय केलं हेच तुला जाणून घ्यायचे आहे. हो ना?
राजेश- अर्थात! आता सांग मला काय आणि कसं झालं ते ! पराग, चिराग, अनुराग आणि तू यांची मैत्री म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये गाजलेली सर्वांच्या चर्चेचा विषय झालेली.
साधना - त्या तिघातून मी कुणाला ‘हो’ म्हणणार याच्यावर तर्क-वितर्क, कॉलेजमध्ये त्याच्यावर पैजा लागल्या म्हणे !
राजेश- मग काय तर! तुझे आणि त्या त्रिकुटाचे मेतकूट याबद्दल सगळ्यांना कुतुहल होते ! कॉमन रुम, कँटीन नाहीतर कॉलेजच्या कुठल्याही कोपºयात तुमच्या तासन्तास काय गप्पा चालायच्या आणि त्यासुद्धा तावातावाने ! सगळ्यांना मोठी गंमत वाटायची !
साधना - त्या तिघांना त्रिदेव म्हणायचे नाही तर ‘एक फुल तीन माली’ म्हणायचे, हे आम्ही ऐकून होतो.
राजेश- मग या स्वयंवरात अनुरागने बाजी कशी काय मारली?
साधना- ओळख तूच ! तुझा तर्क काय चालतो? तुला काय वाटतं. तू तर मला अगदी पहिल्यापासून घरापासून ओळखतोस. माझ्या महेश दादा इतकाच - खरा हितचिंतक दोस्त, कॉलेजमधला माझा पालक- वगैरे-वगैरे
राजेश - नाही बुवा- कठीण आहे सांगणे! काही डोेके चालत नाही. पराग स्मार्ट राजबिंडा, स्पोर्टसमन, पॉप्युलर, त्यामुळे त्याच्याशी जोडी जमेल असे वाटत होते.
साधना- हो! माझ्या मैत्रिणीदेखील मला त्याच्यावरून चिडवायच्या आणि त्यालाही, त्यातल्या काही जणी तर माझ्यावर जळायच्या !
राजेश- मग काय झालं?
साधना- खरं सांगू ! त्याने मला प्रपोजसुद्धा केलं होतं. पण हो नाही म्हणायच्या आत तो युएसला-अमेरिकेला निघून गेला. रिझल्ट लागल्याबरोबर...
राजेश- आश्चर्य आहे.
साधना- बहुधा त्याला कुठल्याही प्रकारे बांधून घ्यायचे नव्हते. तिकडे जाताना आम्ही दोघेही एकमेकांपासून स्पोर्टसमन्, स्पिरीट शिकलो आणि तसेच वागलो.
राजेश- आणि मग चिरागमध्ये काय? तू म्हटलेल्या ‘आ जा सनम’ या एका गाण्यावरच तो फिदा झाला होता.
साधना - आर्ट्स सर्कलमध्ये हिरीरीने भाग घेताना आम्ही जवळ आलो, त्यानेही मला प्रपोज केले होते.
राजेश - वा...! उत्तमच की! मग त्याचे काय झाले?
साधना - राजेश, माझंही त्याच्यावर प्रेम होतं. माझ्या मनात द्वंद्वच सुरू होतं. काय करावं ते कळत नव्हतं.
राजेश - का? काय प्रॉब्लेम झाला? आणि अनुराग.... त्याचं काय?
साधना - नाही, तुला नवल वाटेल, पण अनुरागनं मला कधीच प्रपोज केलं नाही, मात्र त्याच्या बारीकसारीक गोष्टीतून, नजरेतून, वागण्यातून आणि माझ्या वाटणाºया काळजीतून त्याचे प्रेम ओथंबून जात होतं.
राजेश- मग तू निर्णय कसा घेतलास?
साधना- मला जाणवेल की चिरागला माझी सोबत, साथसंगत हवी होती, त्याच्या संगीतात, कलेत माझी फक्त पार्टनरशिप हवी होती. लाईफ पार्टनर शिप? नक्की सांगता येत नव्हतं ! का कुणास ठाऊक.
राजेश- शेवटी तू, निश्चय कसा केलास?
साधना- एका मंत्राच्या आधारे! बघ, तुलासुद्धा उपयोगी पडेल निवड करताना, ज्याच्यावर आपण प्रेम करतो तो नव्हे, तर त्याच्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो त्यालाच पसंत करावं कळलं? आणि मी तेच केलं!
-डॉ.उल्हास कडूसकर, जळगाव