लासूरच्या डीएडधारक युवतीकडून शेतकरी जीवनसाथीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 06:31 PM2018-07-28T18:31:46+5:302018-07-28T18:33:39+5:30
चोपडा तालुक्यातील लासूर येथील मयुरी माळी या डीएड झालेल्या युवतीने यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी आणि शेतीकाम करणारा जीवनसाथी निवडून समाजासमोर आदर्श उभा केला आहे. एवढेच नव्हे तर लग्नातील बडेजाव टाळून नोंदणी पद्धतीने विवाह केला.
आॅनलाईन लोकमत
यावल, दि.२८ : उत्तम शेती, मध्यम व्यापार, आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण सद्या सामाजिकदृष्ट्या मागे पडली असून बहुतेक सर्वच समाजातील विवाहेच्छुक युवतींची नोकरीवालाच वर मिळावा अशी अपेक्षा असते, ही बाब आता सर्वश्रृत आहे. मात्र चोपडा तालुक्यातील लासूर येथील मयुरी ज्ञानेश्वर माळी या डी.एड झालेल्या युवतीने यावल तालुक्यातील किनगाव येथील आध्यात्मिक क्षेत्रात वावर असलेल्या आणि शेती करणाऱ्या प्रकाश भिकन माळी या युवकाची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. विशेष म्हणजे मुलीच्या इच्छेनुसार लग्नात कोणताही बडेजाव न करता नोंदणी पध्दतीने विवाह पार पडला. नवविवाहीत जोडप्याने आपल्या आचरणातून दिलेल्या सामाजिक संदेशाचं सर्व स्तरात कौतुक होत आहे.
किनगाव येथील भिकन माळी यांचा सुरवातीपासूनच आध्यात्मिक क्षेत्रात वावर असल्याने साहजिकच त्यांच्या मुलांमध्येही या विषयाची आवड निर्माण झाली. माळी अल्पभूधारक आहेत. त्यांचा मुलगा प्रकाश हा स्वत:च्या शेतीशिवाय दुस-याची शेती बटाईने करून आणि स्वत: शेतीत राबून कुटूंबाचा चरितार्थ चालवतों. त्याचबरोबर प्रकाश यास आध्यात्माची आवड असल्याने परिसरात कोठेही धार्मिक कार्यक्रम असला म्हणजे पखवाज वादक म्हणून प्रकाश आवर्जुन उपस्थित राहतो. कुटूंबियांचे संस्कार आणि आध्यात्माची ओढ यामुळे प्रकाश निर्व्यसनी आहे.
दरम्यान, लासूर येथील मयुरी ज्ञानेश्वर माळी या डी. एड झालेल्या युवतीने नवरा शेतकरी असला तरी चालेल, पण तो निर्व्यसनी असावा अशी तिची अट होती. सुभाष भगवान महाजन, ह. भ. प. संदिप महाराज, योगेश महाराज पाडळसेकर, गजानन महाराज भोलाणेकर यांनी पुढाकर घेवून प्रकाश माळी याचे नाव सुचविले. वर-वधू पक्षाकडील सर्वांनी त्यास संमती दिली. एवढेच नव्हे तर मयुरी हिने लग्नात कोणताही बडेजाव न करता, तसेच सर्व सामाजिक रुढींना फाटा देऊन नोंदणी पध्दतीने लग्न करावे अशीही अट घातली. यालाही वधू-वर पक्षाकडून संमती मिळाल्यानंतर २१ जुलै रोजी नोंदणी पध्दतीेने हा विवाह पार पडला.
या प्रसंगी वधू-वराकडील जवळच्या आप्तेष्टांसह अनेक जण उपस्थीत होते. शेतकरी संघटनेचे कडूआप्पा पाटील यांनी या विवाहाचे कौतुक करत इतर युवतीनींही मयुरीचा आदर्श घ्यावा असे सांगितले. सर्व समाजात असे आदर्श विवाह होणे गरजचे असल्याचेही त्यांनी पुढे नमुद केले.