चाळीसगावच्या ‘डोगरी-तितूर' संगमाला पर्यटनाचा साज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:16 PM2018-02-10T13:16:28+5:302018-02-10T13:17:20+5:30
पाच कोटीचा निधी मंजुर: मस्तानी अम्मा टेकडीचेही सुशोभिकरण
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. १० - पिर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांचा दर्गाह आणि याच परिसरात पाटणादेवीच्या धवलतीर्थार्तून उगम पावलेली डोंगरी नदी तर पश्चिमेकडून येणारी तितूर यांचा शहरात दत्तवाडी नजीक संगम होतो. याचं संगमाला आणि नजीकच्या मस्तानी अम्मा टेकडी परिसराला पर्यटनाचा साज मिळणार असून आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
चाळीसगाव शहराला ऐतिहासिक पदर आहेत. धार्मिक एकात्मतेचे देखील येथे बामोशी बाबांच्या ऊरुस - यात्रेत दर्शन होते. जवळच असलेल्या गौताळा अभयारण्य आणि पाटणादेवी परिसरात वर्षभर पर्यटक, भाविक आणि अभ्यासकांचा राबता असतो. शहरातही दत्तवाडी परिसरात डोंगरी आणि तितूर या दोन नद्यांचा संगम झाला आहे. याला लागूनच मुस्लिम बांधवांचा मस्तानी अम्मा दर्गाह असून येथेही धार्मिक एकोपा दिसून येतो. संगम आणि दर्गाह परिसराचे धार्मिक पावित्र्य जोपासण्यासह परिसराला पर्यटनाचे रुपडे देण्यात येणार आहे. शहर सौदर्यांसाठी देखील ही मोठी उपलब्धी असणार आहे.
नदीघाट, वानोद्यान
डोंगरी - तितूर संगम स्थळावर नदीला घाट बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यातील डोंगरी नदी पाटणादेवीच्या धवलतीथार्तून उगम पावत असल्याने संगमावर हिंदू बांधव धार्मिक विधीही करतात. संरक्षक भिंत, वनोद्यान, मुलभूत सुविधा, मस्तानी अम्मा टेकडी परिसराचे सुशोभिकरण होईल. यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने ४ कोटी ९२ लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.
पर्यटनाचे कोंदण धार्मिकतेचा साज
गेल्या वर्षी डोंगरी - तितूर नदी पात्राची स्वच्छता केली गेली. चाळीसगावची लाईफ लाईन अशी ओळख असणा-या या नद्यांनी मोकळा श्वास घेतला. संगम परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा. ही मागणी याव्दारेच पुढे आली. याचा पाठपुरावा करुन आमदार पाटील हे पाच कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणण्यात यशस्वी ठरले आहेत.
घाणीसह सततच्या दूर्लक्षामुळे संगम परिसर शापच ठरला होता. मात्र गेल्या वर्षी नदीपात्राची स्वच्छता करुन पालिकेने पुढचे पाऊल टाकले. पर्यावरणप्रेमी आणि हिंदू - मुस्लीम बांधवांच्या मागणी नुसार परिसर विकासाचा कृती आराखडा पर्यटन विभागाला सादर केला. निधी प्राप्त झाला असून यामुळे चाळीसगाव शहराचे सौंदर्य आणखी उजळणार आहे.
- उन्मेष पाटील, आमदार चाळीसगाव