चोपडा-अंकलेश्वर रस्त्याची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 08:43 PM2019-09-15T20:43:55+5:302019-09-15T20:44:21+5:30
सा.बां. विभागाकडून दुर्लक्ष : मुरूम टाकण्याचेही सौजन्य नाही
चोपडा : चोपडा-अंकलेश्वर रस्त्याची चाळणी होऊन तीनतेरा झाले आहेत. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाकडून डोळेझाक होत असून त्याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
शहरातील प्रताप विद्या मंदिरापासून ते अंकलेश्र्वर ब-हाणपूर मार्गाला जोडणा-या जुन्या शिरपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तेथून पुढे अंकलेश्वर महामार्गाची हद्द सुरू होते. मात्र या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांंमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माती वा बारीक मुरूम भरण्याचे कष्टही घेतले जात नाहीत.
एखादा मोठा अपघात झाल्यावरच गांभीर्याने दखल घेतली जाईल काय? अशा प्रतिक्रिया वाहन धारकांकडून व्यक्त होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधींंचा निधी देण्यात आला होता. पण काम निकृष्ट झाले असल्याने संपूर्ण रस्ता अत्यल्प काळात खराब झाला आहे. शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयापासून पालिका हद्दीतील रस्त्यासाठी दीड कोटीचा निधी मिळाला आहे. मात्र काम पावसामुळे सुरू करता येत नसल्याचे समजले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावरील खड्डे मुरूमाने भरावेत, अशी मागणी वाहनचालक तसेच नागसरिकांतून होत आहे.
पावसाच्या उघडिपीनंतर काम सुरू करणार
चोपडा अंकलेश्वर रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता खूप खराब आहे. त्याबाबत विचारले असता, त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दोन वेळा मुरूम भरला आहे. पुन्हा पाऊस बंद झाला की मुरूम टाकून खड्डे भरले जातील. सततच्या पावसामुळे भरलेला मुरूम टिकत नासल्याने पुन्हा खड्डे तयार होत आहेत. चांगली उघडीप मिळाली की पुन्हा काम सुरू केले जाईल. राहिलेल्या काही भागात नवीन डांबरीकरण केले जाईल, अशी माहिती चोपडा सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी पी.जे. शुशिर यांनी दिली.