चोपडा तालुक्यातील बेपत्ता बालकाचे तुकडे करून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 05:38 PM2019-02-05T17:38:08+5:302019-02-05T17:39:24+5:30
मृतदेहाचा शोध
चोपडा, जि. जळगाव : तालुक्यातील चहार्डी येथील शिवाजीनगरमधील रहिवासी दगडू लोटन पाटील यांचा मुलगा मंगेश दगडू पाटील (१४) या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अज्ञात व्यक्तीने तुकडे-तुकडे करून निर्घृणखून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या बालकाचा केवळ एक पाय सापडला असून पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत.
मंगेश हा २ रोजी शनिवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर शौचास जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही. तो परत न आल्याने त्याचे वडील दगडू लोटन पाटील यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरुन अज्ञा व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी शिवाजीनगर शेजारील बाभूळ वनात या बालकाचा खून केल्याचे उघड झाले आहे. खून झालेल्या बालकाचा एक पाय कुत्र्याने शिवाजीनगर लगत असलेल्या खळवाडीत ओढून आणल्याने या घटनेचा उलगडा झाला. घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी मनोज पवार, सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर, अर्चना कुरपुळे, पोहेका सुनील पाटील, राजू महाजन, संतोष पारधी, सुनील कोळी, नीलेश सोनवणे, प्रदीप राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले असून मुलाच्या मृतदेहाचा शोध घेत आहे. त्यानंतर जळगाव येथून श्वान पथक मागविण्यात आले.