चोपडा येथील भाजपाच्या ‘त्या’ दोन्ही पदाधिकाऱ्यांची बडदास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:25 PM2018-12-10T13:25:36+5:302018-12-10T13:27:25+5:30
परवानगी नसताना घरच्या जेवणाची सोय
जळगाव : पोलीस अधिका-याची कॉलर पकडल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले चोपडा येथील भाजपाचे आजी-माजी शहराध्यक्षांसह तिघे जण दोन दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल आहे. तेथे त्यांना घरचे जेवण दिले जात असल्याची माहिती मिळाली.
चोपडा येथे वाहन अडविल्यावरून वाद होण्यासह पोलीस निरीक्षकांची कॉलर पकडल्याच्या प्रकरणात चोपडा येथील भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील (३१), माजी शहराध्यक्ष राजू उर्फ अनिल चिरंजीलाल शर्मा (५०) व कार्यकर्ते मनीष विजयमल पारीख (४४) तिघे रा. चोपडा यांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर ७ रोजी रात्री रक्तदाब व इतर त्रास होऊ लागल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून ते तेथेच दाखल आहे.
रविवारी दुपारी त्यांना घरचे जेवण आणून देण्यात आले व ते कक्षाच्या बाहेर बसून तेथे जेवण करीत होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
या तिघांना घरच्या जेवणाची परवानगी नसून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातीलच जेवण देण्याच्या सूचना असताना व या कक्षानजीक पोलीस कर्मचारी तैनात असताना देखील भाजपाच्या या पदाधिकाºयांची बडदास्त ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत येणाºया बहुतांश आरोपींना कारागृह व रुग्णालय प्रशासनाकडून व्हीआयपी वागणूक दिली जाते. सामान्य आरोपींकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. रुग्णालयात दाखल करण्यासाठी लाच घेताना दोन जणांना दोन वर्षापूर्वी अटक झाली होती.दरम्यान, याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.