स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात जळगाव एसटी विभागातील चोपडा बसस्थानक राज्यात दुसरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 12:44 AM2024-02-14T00:44:20+5:302024-02-14T00:46:17+5:30
या अभियानातील तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात २५० आगारातील अ वर्गातील १४७ बसस्थानकांमध्ये कराड बसस्थानकाचा प्रथम क्रमांक, तर जळगाव विभागातील चोपडा बसस्थानकाने दुसरा क्रमांक मिळविला आहे. तिसऱ्या स्थानावरील काटोल व संगमनेर बसस्थानकांनी समान गुण मिळविले आहेत.
भूषण श्रीखंडे -
जळगाव : राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा व बसस्थानकात स्वच्छ आणि सुंदर वातावरणात राहावे, यासाठी राज्य शासनाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियानांतर्गत राज्यातील सर्व एसटी महामंडळाच्या बसस्थानकात राज्यस्तरीय समितीकडून सर्वेक्षण केले. या अभियानातील तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात २५० आगारातील अ वर्गातील १४७ बसस्थानकांमध्ये कराड बसस्थानकाचा प्रथम क्रमांक, तर जळगाव विभागातील चोपडा बसस्थानकाने दुसरा क्रमांक मिळविला आहे. तिसऱ्या स्थानावरील काटोल व संगमनेर बसस्थानकांनी समान गुण मिळविले आहेत.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचीही वाहतूक सेवा स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले होते. राज्यातील ‘अ’ वर्गातील बसस्थानकांमध्ये पुणे प्रादेशिक विभाग व सातारा एसटी विभागातील कराड बसस्थानकाने ८१ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नाशिक प्रादेशिक विभागातील जळगाव एसटी विभागातील चोपडा बसस्थानकाने ७९ गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे. नागपूर विभागातून काटोल व अहमदनगर एसटी विभागातील संगमनेर या बसस्थानकांनी ७५ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे.
नाशिक प्रादेशिक, जळगाव विभागात चोपडा नंबर वन
अ, ब, क नुसार वर्गवारी करून बसस्थानकांचे तीन टप्प्यात सर्वेक्षण केले होते. नाशिक प्रादेशिक विभागात चोपडा एकनंबर असून, दोन नंबरवर संगमनेर, तर धुळे विभागातील दोंडाईचा ७४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच जळगाव एसटी विभागात ‘अ’ वर्गवारी बसस्थानकात चोपडा प्रथम, ६१ गुण मिळवीत चाळीसगाव दुसरे, तर जामनेर बसस्थानकाने ६० गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.